Jharkhand News: झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी बूक केला रिसॉर्ट, सर्व आमदार शिफ्ट होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 04:26 PM2022-08-30T16:26:47+5:302022-08-30T16:28:52+5:30
Hemant Soren News: झारखंडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन सर्व आमदारांना घेऊन एका रिसॉर्टवर जाणार आहेत.
Hemant Soren Jharkhand News:झारखंडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) सर्व आमदारांना घेऊन रांचीवरुन रायपूरला जाणार आहेत. यासाठी त्यांनी 72 सीटर इंडिगो चार्टर प्लेनही बूक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळपर्यंत विमानाने झारखंडमधून बाहेर घेऊन जाण्याची तयारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या मेफेयर रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी 47 रुम बूक करण्यात आल्या आहेत. झारखंडवरुन जाणारे सर्व आमदार सायंकाळी 7 वाजेपर्यंत तिथे पोहोचतील. विशेष म्हणजे, या आमदारांसोबत मुख्यमंत्री सोरेन स्वतः जाणार नाहीत. याबाबत फक्त चर्चा सुरू असून, ठोस माहिती समोर आलेली नाही.
सोरेन यांच्यावर राजकीय संकट
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व धोक्यात आले आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Jharkhand Governor Ramesh Bais) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडे (ECI) पाठवू शकतात. याआधी युतीच्या सर्व आमदारांना रायपूरला हलवले जात आहे.
झारखंडमधील राजकीय परिस्थिती
हेमंत सोरेन यांनी 1 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. यामध्ये जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतेले जाऊ शकतात. तसेच, सोमवारी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांच्या विधानसभेवरही निवडणूक आयोगात चर्चा झाली, मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.