रेल्वेनं मनं जिंकली! प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी ३ किमी उलट दिशेनं चालवली ट्रेन, वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:17 PM2021-10-27T17:17:05+5:302021-10-27T17:18:08+5:30
माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत.
माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत. गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी ट्रेन तीन किलोमीटर उलट दिशेनं चालवली. बाकया टाटानगर ते भुवनेश्वर रेल्वेमार्गावर ही घटना घडली आहे. टाटानगरहून भुवनेश्वरसाठी मंगळवारी रात्री रवाना झालेल्या आनंद विहार-भुवनेश्वर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये (Sampark Kranti Express) एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी ट्रेन गंतव्य स्थानाच्या विरुद्ध दिशेनं चालवावी लागली.
ट्रेन जवळपास तीन किलोमीटर विरुद्ध दिशेनं प्रवास करुन टाटानगर रेल्वे स्थानकावर आणण्यात आली आणि रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय पथकानं गर्भवती महिलेला मदत केली. वैद्यकीय पथकाच्या सहाय्यानं महिलेला खासमहलस्थित एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेची यशस्वीरित्या प्रसूती झाली आणि आई व मूल दोघंही सुखरुप असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. संबंधित महिलेचं नाव रानू दास असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेला वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द केल्यानंतर रेल्वेनं पुन्हा गंतव्य दिशेकडे प्रवास सुरू केला. दरम्यान, रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं आणि तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केलं.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रेल्वेच्या कोच क्रमांक-५ मधून प्रवास करत होती. त्यांना जलेश्वर रेल्वेस्थानकावर उतरायचं होतं. ट्रेन राशी उशिरा टाटानगर रेल्वेस्थानकातून निघाली. काही वेळानंतर संबंधित महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि याची माहिती मोटरमनला मिळाली. तातडीनं याची माहिती टाटानगर रेल्वे स्थानकात देण्यात आली. ट्रेन टाटानगर स्थानकापासून जवळपास अडीच ते तीन किलोमीटर पुढे निघून गेली होती. टाटानगर रेल्वे स्थानक अधिक्षकांनी ग्रीन सिग्नल देताच तातडीनं ट्रेन उलट दिशेने नेत पुन्हा एकदा टाटा नगर रेल्वेस्थानकावर आणण्यात आली.
टाटानगरहून तीन किमी पुढे ट्रेन पोहोचली होती आणि पुढचं स्थानक येण्यासाठी कमीत कमी दोन तास लागले असते. त्यामुळे महिला आणि बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे टाटानगर रेल्वे स्थानक जवळ असल्याचं पुन्हा मागे परतण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ट्रेन पुन्हा टाटानगर रेल्वे स्थानकावर पोहोचेपर्यंत रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून वैद्यकीय पथक तयार ठेवलं. वैद्यकीय पथक वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचलं आणि महिलेला वेळीच उपचार मिळाले. रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांचं आणि त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचं प्रवाशांकडून तोंड भरुन कौतुक केलं गेलं.