"रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं सोडून द्यावं"; अपघातावरुन ममता-अखिलेश यांचा मोदी सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:00 PM2024-07-30T13:00:39+5:302024-07-30T13:03:12+5:30
Jharkhand Train Accident : सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला.
झारखंडच्या सरायकेला-खरसावां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात १८ डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. २०१४ पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करून काँग्रेसने केंद्रावर हल्लाबोल केला, तर JMM ने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करत रील बनवणं सोडून द्यावं असं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलं की, "रेल्वे अपघात आता नियमित झाले आहेत. दर आठवड्याला घटना घडत आहेत. सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. यात अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हे खूप दुःखद आहे."
Another disastrous rail accident! Howrah- Mumbai mail derails in Chakradharpur division in Jharkhand today early morning, multiple deaths and huge number of injuries are the tragic consequences.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) July 30, 2024
I seriously ask: is this governance? This series of nightmares almost every week,…
"रेल्वे रुळांवर प्रवाशांच्या मृत्यूची आणि जखमींची मालिका किती दिवस सुरू राहणार? हे आम्ही किती दिवस सहन करणार? भारत सरकारच्या असंवेदनशीलतेला अंत होणार नाही का?" सपा खासदार अखिलेश यादव य़ांनी देखील यावर भाष्य केलं आहे. सरकारला प्रत्येक क्षेत्रात रेकॉर्ड बनवायचे आहे. सध्या पेपरफुटीचे रेकॉर्ड सुरू होते. यामागे रेल्वे अपघातांचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. एवढे मोठे सुरक्षा बजेट असतानाही इतके रेल्वे अपघात का होत आहेत? असा सवाल विचारला आहे.
झारखंड मुक्ती मोर्चानेही याप्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरलं. रेल्वेमंत्र्यांनी रील बनवणं थांबवावं आणि रेल्वेवर लक्ष केंद्रित करावं. हेमंत सोरेन किंवा इंडिया आघाडीचा यात कोणताही हात नाही. आम्हाला ईडी-सीबीआयमध्ये अडकवण्याची धमकी देऊ नका असं म्हटलं आहे. "रेल्वे अपघात सातत्याने होत आहेत. हे लाजिरवाणे आहे. रेल्वे अपघातांवर कारवाई होत नाही. आमचे रेल्वेमंत्री केवळ प्रचारात व्यस्त आहेत" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.