थंडीमुळे नवरदेव पडला बेशुद्ध; वधूने दिला लग्नास नकार , रिकाम्या हाताने परतली लग्नाची वरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:14 IST2024-12-17T15:10:59+5:302024-12-17T15:14:31+5:30
झारखंडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे एका तरुणाचे लग्न मोडलं आहे.

थंडीमुळे नवरदेव पडला बेशुद्ध; वधूने दिला लग्नास नकार , रिकाम्या हाताने परतली लग्नाची वरात
Shocking News : उत्तर भारतासह संपूर्ण देशात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. दुसरीकडे या कालावधीत अनेक मुहूर्त असल्याने देशभरात लग्नसराई सुरु आहे. मात्र या कडाक्याच्या थंडीमुळे छत्तीसगडमध्ये एक लग्न मोडलं आहे. लग्नमंडपात थंडीमुळे नवरदेव बेशुद्ध पडल्याने वधूने लग्न मोडलं आहे. त्यामुळे तरुणाला रिकाम्या हाताने वरात घेऊन माघारी फिरावं लागलं.
झारखंडच्या जगप्रसिद्ध द्वादश ज्योतिर्लिंग बाबा बैद्यनाथ धाममध्ये अनेक विवाह होतात जे चर्चेचा विषय बनतात. मात्र देवघर जिल्ह्यातील मोहनपूर परिसरात असलेल्या घोरमारा येथे कडाक्याची थंडीच्या लाटेत लग्न करणे एका तरुणाला महागात पडले. थंडीमुळे या तरुणाचे लग्न होण्याआधीच तुटले. अर्णव नावाच्या मुलाचे लग्न अंकिता नावाच्या मुलीशी होणार होते. दोन्ही पक्षांच्या संमतीने हा विवाह एका खासगी गार्डन कॅम्पसमध्ये होत होता. थंडी असूनही सर्व काही उत्साहात सुरु होते. लग्नाआधीचे सर्व विधी वेळेत पूर्णही झाले होते.
सुरुवातील दोन्ही पक्षांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वरमालाच्या विधीसाठी मोकळ्या आकाशाखाली स्टेज बांधण्यात आला. तिथेच वधू वर एकमेकांना वरमाला घालणार होते. त्यानंतर सर्वजण लग्नमंडपात पोहोचले. जेवणानंतर वधू-वरही मंडपात आले. त्यानंतर भटजींनी विवाह विधी सुरू केला. दरम्यान, अचानक नवरदेव बेशुद्ध पडला. नवरदेवाचे अंग थंड झाले होते. घरच्यांनी घाईघाईने नवरदेवाला खोलीत नेले आणि त्याचे हातपाय चोळायला सुरुवात केली.
त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना बोलवून आणण्यात आलं. थंडी कमी होण्यासाठी नवरदेवाला सलाईन आणि इंजेक्शन दिलं. सुमारे एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती सामान्य झाली. त्यामुळे तो पुन्हा मंडपात बसण्यास तयार झाला. मात्र वधूने फेरे घेण्यास स्पष्ट नकार दिला. वधूने सांगितले की मुलाला काही आजार आहे, त्यामुळे ती त्याच्याशी लग्न करणार नाही.
वधूचा संशय वाढला कारण सहसा नवरदेवाच्या लग्नाची वरात ही त्यांच्या घरातून वधूच्या घरी जाते. परंतु या लग्नात वधूच्या पक्षाला वराच्या घरी बोलावून एका खाजगी बागेत लग्न केले जात होते. दोन्ही पक्षातील वाद वाढत जाऊन पहाटेचे ५ वाजले. त्यानंतर हे प्रकरणा पोलिसांत गेले आणि या प्रकरणाची माहिती मोहनपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलीस ठाण्याचे पथक तिथे दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगितले. मात्र कोणताही मार्ग निघाला नाही. सकाळी आठ वाजेपर्यंत बोलणी न झाल्याने अखेर नवरदेव वरात घेऊन घरी निघून आला. तर वधू पक्ष भागलपूर बिहार येथील त्यांच्या घरी परतला.