झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी, सीबीआय न्यायालय शुक्रवारी सुनावणार शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:20 AM2017-12-14T05:20:55+5:302017-12-14T05:20:55+5:30
कोळसा घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांच्याबरोबरच माजी सचिव एच. सी. गुप्ता व आणखी चार जणांनाही दोषी दोषी ठरविले असून, न्यायालय उद्या शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे.
नवी दिल्ली: कोळसा घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांच्याबरोबरच माजी सचिव एच. सी. गुप्ता व आणखी चार जणांनाही दोषी दोषी ठरविले असून, न्यायालय उद्या शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे.
निवडणूक आयोगाने आधी दिलेल्या एका दणक्यानंतर कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणीही मधू कोडा दोषी ठरले आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण आहे. अनियमित पद्धतीने कोळसा खाणीचे वाटप केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यात मधू कोडा व अन्य आरोपींना कट रचल्याबद्दल व भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
मधू कोडा यांनी २00६ साली झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एके काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय असणाºया मधू कोडा यांनी आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनद्वारे आपला राजकीय प्रवास सुरू केला. मुख्यमंत्री होण्याआधी अपक्ष आमदार असलेले कोडा से बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र २00५ साली भाजपाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले.
त्या निवडणुकीमध्ये झारखंडमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला पाठिंबा दिला. मात्र नंतर तो काढून घेतला आणि काँग्रेस व अन्य आमदारांच्या मदतीने ते स्वत:च मुख्यमंत्री झाले होते.
निवडणूक लढण्यास आधीच बंदी
मधू कोडा यांना यापूर्वी निवडणूक आयोगाने दणका दिला होता आणि त्यांना तीन वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली होती. खर्चाचा योग्य हिशेब सादर न केल्याबद्दल आयोगाने हा निर्णय घेतला होता.