जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क होणार, केंद्रीय वन मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:10 PM2021-10-06T13:10:54+5:302021-10-06T13:11:03+5:30
3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली.
जगातील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट उद्यानाचे नाव लवकरच रामगंगा राष्ट्रीय उद्यान होणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या दरम्यान त्यांनी उद्यानाचे नाव बदलून रामगंगा राष्ट्रीय उद्यान केलं जाणार असल्याची माहिती दिली.
जिम कॉर्बेट पार्कला भेट देताना केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात केवळ अधिकाऱ्यांशीच चर्चा केली नाही, तर धनगडी येथील संग्रहालयात ठेवलेल्या विजीटर बूकमध्ये उद्यानाचे नाव रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे लिहिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत वाघांच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे येथे आले होते.
कार्यक्रमानंतर ते धनगढी येथील संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिम कॉर्बेट पार्कची सविस्तर माहिती घेतली. नंतर सर्व अधिकाऱ्यांसमोर कॉर्बेट पार्कचे नाव बदलून रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे करण्याचे निर्देश दिले. आता लवकरच अधिकृतरित्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून रामगंगा राष्ट्रीय उद्यान होणार आहे.
उद्यानाचे नाव पूर्वी रामगंगा राष्ट्रीय उद्यान होते
1936 मध्ये स्थापनेच्या वेळी या उद्यानाला हेली राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले होते. या उद्यानाचे नाव संयुक्त प्रांताचे राज्यपाल माल्कम हेली यांच्या नावावरुन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर या उद्यानाला रामगंगा राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले. 1957 मध्ये तत्कालीन प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेटच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्याचे नामकरण जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान करण्यात आले. उत्तराखंडच्या नैनीताल आणि पौरी जिल्ह्याच्या दरम्यान पसरलेल्या या उद्यानात बंगाल टायगर, एशियन हत्ती, बिबट्या, रानडुक्कर, अस्वल, जॅकल, मुंगूस आणि मगर इत्यादी प्राणी आहेत.