भीषण अपघात! ट्रक-पिकअप व्हॅनची धडक; अस्थी विसर्जनावरून येताना काळाचा घाला, 6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 15:20 IST2022-05-24T15:19:34+5:302022-05-24T15:20:43+5:30
अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

भीषण अपघात! ट्रक-पिकअप व्हॅनची धडक; अस्थी विसर्जनावरून येताना काळाचा घाला, 6 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली - हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात ट्रक आणि पिकअप व्हॅन यांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिंद-चंदीगड रस्त्यावरील कंडेला गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअपची धडक झाली.
धडक इतकी जोरदार होती की आजूबाजूच्या गावातही आवाज ऐकू आला. हे सर्वजण हिसार जिल्ह्यातील नारनौंद गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर अस्थीचे विसर्जन करून सर्वजण हरिद्वारहून परतत होते. या अपघातानंतर ट्रक चालक हा फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते फरार चालकांचा शोध घेत आहेत.
कंडेला गांव के पास ट्रक और पिकअप वैन का एक्सिडेंट हुआ। वैन में 23 यात्री सवार थे जिसमें 6 लोगों की मृत्यु हो गई। अन्य लोगों को अस्पताल में भर्ती किया गया। अभी किसी व्यक्ति ने बयान नहीं दिया है, बयान देने के बाद मामला दर्ज़ कर कार्रवाई करेंगे: दिनेश कुमार, सदर थाना प्रभारी, जींद pic.twitter.com/BmbdVC44Bp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 24, 2022
अपघातातील जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, हिसार जिल्ह्यातील नारनौड गावातील रहिवासी प्यारे लाल यांचा नुकताच मृत्यू झाला होता. सोमवारी कुटुंबीय पिकअप वाहनाने अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले होते. मंगळवारी सकाळी हरिद्वारहून नारायणला परतत असताना कंडेला गावाजवळ जींदहून कैथलकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपची धडक बसली.
या अपघातात पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 17 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले. या अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.