जिंकलत साहेब... वृद्ध फुगेवाल्याची सायकल चोरीला गेली, ठाणे अंमलदाराने नवीनच घेऊन दिली
By महेश गलांडे | Published: January 19, 2021 03:35 PM2021-01-19T15:35:34+5:302021-01-19T15:38:02+5:30
65 वर्षीय बंगालीराम यांना अपत्य नसून एक जुन्या सायकलमुळेच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कारण, आपल्या जुन्या सायकलला सोबत घेऊन ते फुगे विकण्याचं काम करायचे.
आग्रा - पोलीस ठाण्याची पायरी चढायची म्हटलं तरी सर्वसामान्य माणसांना भीती वाटते. पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार सरू होता. त्यामुळे, पोलिसात तक्रार देण्यासाठीही लोक आग्रही नसतात. त्यामुळेच, मोबाईल किंवा सायकल चोरीच्या घटनांची तक्रारही पोलिसात देण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, आग्र्यातील एका पोलीस ठाण्यातील साहेबांनी आदर्शवत काम केलंय. सायकल चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चक्क नवी सायकलच घेऊन दिलीय. पोलिसांचे हे सरप्राईज गिफ्ट सध्या तेथील भागात चर्चेचा विषय ठरले आहे.
65 वर्षीय बंगालीराम यांना अपत्य नसून एक जुन्या सायकलमुळेच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कारण, आपल्या जुन्या सायकलला सोबत घेऊन ते फुगे विकण्याचं काम करायचे. त्यामुळे, दिवसभरात मिळालेल्या पैशातून पोटात दोन घास टाकण्यास मदत होई. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांची सायकल चोरीला गेल्याने त्यांच्या कमाईच साधनच बंद झालं. याप्रकरणी ते पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. पोलिसांनी बंगालीराम यांची तक्रार लिहून घेतली. पण, पोलीस ठाण्यातच त्यांना अश्रू अनावर झाले. कारण, केवळ तक्रार घेऊन त्यांची समस्या सुटणार नव्हती. त्यामुळे, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने त्यांना धीर दिला, थोडी चर्चा केली. विशेष म्हणजे काही वेळातच त्यांना नवीन सायकल सरप्राईज भेट दिली. पोलिसांनी दाखवलेल्या या सौहार्दपणामुळे बंगालीराम यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले होते.
बंगालीराम यांचे फुगे विकत असताना एका गल्लीतून त्यांची सायकल चोरीस गेली होती. उदरनिर्वाहाचं एकमेव साधन चोरीला गेल्यामुळे ते अछनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करायला गेले होते. त्यावेळी, पोलीस अधिकारी उदयवीर यांच्यासमोर त्यांना रडू कोसळले. उदयवीर यांनी माणूसकी जपत, बंगालीराम यांची समस्याच दूर केली. उदयवीर यांनी बंगालीराम यांना चहा-पाणी दिले. त्यानंतर, दोन कर्मचाऱ्यांनी नवीन सायकल आणण्याचे सांगितले आणि बंगालीराम यांना नवीन सायकल सरप्राईज भेट दिली. दरम्यान, सोशल मीडियावर पोलीस अधिकारी उदयवीर अन् बंगालीराम यांच्या सायकल भेटीची चांगलीच चर्चा होत असून त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.