धन धना धन! जिओनं कमाईत पटकावलं दुसरं स्थान; व्होडाफोनची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:19 AM2018-08-27T11:19:47+5:302018-08-27T11:21:41+5:30
Jio Overtake Vodafone: महसुली उत्पन्नात एअरटेल पहिल्या क्रमांकावर
नवी दिल्ली: रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं कमाईच्या बाबतीत दूरसंचार क्षेत्रात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. रिलायन्स जिओनंव्होडाफोनला मागे टाकलं आहे. याशिवाय जिओनं भारती एअरटेलला मागे टाकण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ग्रामीण भागात मारलेली मुसंडी आणि कमी किमतीत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या जोरावर जिओनं दमदार कामगिरी केली आहे. यामुळे जिओच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनं दोन वर्षांपूर्वी 4जी सेवा देण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं महसुली उत्पन्नाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. देशातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांचा महसूल लक्षात घेता, त्यातील रिलायन्स जिओचा वाटा 22.4 टक्के इतका आहे. जून 2018 च्या तिमाहीत रिलायन्स जिओनं मोठी मुसंडी मारली आहे. मार्च तिमाहीच्या तुलनेत जिओच्या महसूलात 2.53 टक्क्यांची वाढ झाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरटी ऑफ इंडियानं (ट्राय) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जून तिमाहीत व्होडाफोनच्या महसुली उत्पन्नात 1.75 टक्क्यांची घट झाली. त्यामुळे व्होडाफोनचा महसुली उत्पन्नातील वाटा 19.3 टक्क्क्यांवर आला. तर कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडियाचा वाटा 15.4 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकावर असलेल्या एअरटेलचा महसुली उत्पन्नातील वाटा घसरला आहे. देशातील दूरसंचार कंपन्यांचं एकूण महसूल लक्षात घेतल्यास, त्यातील एअरटेलचा वाटा 31.7 टक्के इतका आहे. महसुलच्या बाबतीत एअरटेल पहिल्या क्रमांकावर आहे.