केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद रस्ते अपघातात जखमी, डोक्याला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 06:41 PM2024-07-20T18:41:35+5:302024-07-20T18:43:48+5:30
Jitin Prasad Accident : केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला ताफ्यातील गाडी धडकली
Jitin Prasad Accident : केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद हे रस्ता अपघातात जखमी झाले आहेत. जितीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील आपल्या पिलीभीत लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांची गाडीची ताफ्यातील एका वाहनाला धडक बसली. या धडकेत जितिन प्रसाद यांच्यासह खासगी सचिवही जखमी झाले आहेत. ही घटना मझोला-विज्टी रोडवरील बहरुआ गावात घडली. जितीन प्रसाद यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद हे आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट गाडीने अचानक ब्रेक लावला. त्यानंतर मागून येणाऱ्या जितिन प्रसाद यांची गाडीही थांबली. मात्र त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या दुसऱ्या एस्कॉर्ट गाडीने धडक दिली. या घटनेत कारचे नुकसान झाले असून जितीन प्रसाद यांनाही किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर जितीन प्रसाद हे खराब झालेले वाहन घटनास्थळी सोडून दुसऱ्या वाहनात कार्यक्रमासाठी रवाना झाले.
दरम्यान, जितिन प्रसाद हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील पूरग्रस्त गावं आणि परिसरांना भेट आहेत. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजीव प्रताप सिंह, आमदार सुधीर गुप्ता आणि आमदार प्रकाश नंद यांची वाहनेही त्यांच्या ताफ्यात होती. अलीकडेच, अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने परिसरातील अनेक गावांना वेढले आणि तेथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे जितिन प्रसाद हे पूरग्रस्त गावं आणि भागांची पाहणी करत आहेत.