PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:59 PM2024-10-07T20:59:52+5:302024-10-07T21:01:11+5:30
JK Elections 2024: उद्या, म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
JK Elections Post Poll Alliance: उद्या, म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या निकालापूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांनी सोमवारी(07 ऑक्टोबर) मोठे वक्तव्य केले आहे. 'भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशी युती करण्यास आम्ही तयार आहोत,' असे सूचक विधान फारुक अब्दुल्ला यांनी केले आहे.
मीडियाशी संवाद साधताना पत्रकारांनी फारुक अब्दुल्ला यांना विचारले की, गरज पडल्यास पीडीपीसोबत युती करायला आवडेल का? यावर ते म्हणाले- 'का नाही? काय फरक पडतो? आम्ही सर्व एकाच गोष्टीसाठी काम करत आहोत. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी, आम्हाला यात काही अडचण नाही. मला खात्री आहे की काँग्रेसचाही यावर आक्षेप नसेल.'
फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार?
फारुख अब्दुल्ला यांना असेही विचारण्यात आले की, आघाडी सरकार स्थापन झाल्यास ते मुख्यमंत्री होणार का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले- 'मी मुख्यमंत्री होणार नाही. मी माझे काम केले आहे. आता आपण मजबूत सरकार कसे बनवायचे, हे माझे काम असेल. अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलण्यास तयार आहोत, मात्र त्यांच्या पाठिंब्यासाठी भीक मागणार नाही. राज्य मजबूत करण्याची इच्छा असेल, तर त्यांचे स्वागत आहे', असेही ते म्हणाले.
पीडीपी 'किंगमेकर'ची भूमिका बजावणार?
फारुख अब्दुल्ला यांनी पुढे सांगितले की, 'पीडीपीला आघाडीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, परंतु जागावाटपावर कोणताही करार होऊ शकला नाही, त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र एक्झिट पोलने त्रिशंकू विधानसभा होण्याचे संकेत दिले आहेत, अशा स्थितीत पीडीपी 'किंगमेकर'ची भूमिका बजावू शकते', असेही ते म्हणतात.
PDP कोणासाठी खास असेल?
जम्मू आणि काश्मीर निवडणुकांच्या एक्झिट पोलनुसार, NC-काँग्रेस आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल, परंतु 90 सदस्यांच्या सभागृहात 46 आमदारांच्या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत. तर, पीडीपीला 4 ते 12 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, पीडीपी यंदा किंग मेकरच्या भूमिकेत दिसू शकते.