जम्मू विभागातील इंटरनेट सेवा पुन्हा बंद; मेहबूबा वाचनात दंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 12:24 AM2019-08-19T00:24:18+5:302019-08-19T00:29:24+5:30
काश्मिरातील निर्बंध शनिवारी थोडे शिथिल केल्यानंतर श्रीनगरसह सुमारे डझनभर ठिकाणी जमावाने रस्त्यांवर येऊन निदर्शने केल्याच्या घटना घडल्याने श्रीनगर शहराच्या काही भागांत रविवारी निर्बंध अधिक कडक करण्यात आले.
श्रीनगर : अफवांना आळा घालणे व शांतता राखणे यासाठी शुक्रवारी रात्रीपासून जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली २-जी इंटरनेट सेवा रविवार दुपारपासून पुन्हा बंद करण्यात आली. त्याआधी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या आधीपासून सुमारे १५ दिवस ही सेवा पूर्णपणे बंदच होती.
काश्मिरातील निर्बंध शनिवारी थोडे शिथिल केल्यानंतर श्रीनगरसह सुमारे डझनभर ठिकाणी जमावाने रस्त्यांवर येऊन निदर्शने केल्याच्या घटना घडल्याने श्रीनगर शहराच्या काही भागांत रविवारी निर्बंध अधिक कडक करण्यात आले. खोऱ्यातील इतर ठिकाणी १४ व्या दिवशीही निर्बंध सुरूच राहिले. सहा ठिकाणी निदर्शनांच्या वेळी झालेल्या हिंसाचारात आठ नागरिक जखमी झाले. हजहून परतलेल्या ३०० यात्रेकरूंची पहिली तुकडी रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरली. (वृत्तसंस्था)
अब्दुल्ला हॉलिवूडमध्ये तर मेहबूबा वाचनात दंग
नजरकैदेत असलेले माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला वेळ घालविण्यासाठी हॉलिवूडचे चित्रपट पाहतात व जीममध्ये व्यायाम करतात. तर पीडीपीच्या प्रमुख व नजरकैदेत असलेल्या दुसºया माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती विरंगुळा म्हणून वाचनात दंग असतात.