काश्मीरमधल्या शोपियानमध्ये स्कूल बसवर दगडफेक, एक लहानगा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 05:05 PM2018-05-02T17:05:22+5:302018-05-02T17:05:22+5:30
शोपियानमधल्या कनिपोरामध्ये चक्क एका स्कूल बसवर दगडफेक करण्यात आल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन टेररिस्ट ऑलआऊटअंतर्गत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा केला होता. त्यानंतर काश्मीर खो-यात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली आहे.
शोपियानमधल्या कनिपोरामध्ये चक्क एका स्कूल बसवर दगडफेक करण्यात आल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या दगडफेकीत स्कूल बसमधील एक मुलगा जखमी झालाय. स्कूल बसमध्ये 4 ते 5 वर्षांची मुलं होतं. दगडफेकीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून जोरदार निषेध नोंदवला जातोय. मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तींपासून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची निंदा केली आहे.
यावेळी शोपियानमध्ये पीडीपी आमदार मोहम्मद युसूफ यांच्या घरावरही अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले आहेत. दगडफेकीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, माझा मुलगा दगडफेकीत जखमी झाला. हे माणुसकीच्या विरोधात आहे. उद्या कोणत्याही निरागस मुलाबरोबर असं होऊ शकतो.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या प्रकाराचा निषेध नोंदवत स्कूल बसमधल्या मुलांवर दगडफेक करणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. लहान मुलं आणि पर्यटकांवर दगड फेकून हे दगडफेक करणारे स्वतःचा अजेंडा कशा प्रकारे पूर्ण करतायत. आपण सर्वांनी मिळून यांना धडा शिकवायला हवा. जम्मू-काश्मीरचे महासंचालक एसपी वैद्य यांनीही तर हा वेडेपणा असल्याचं सांगितलं आहे. उपद्रवी लोकांनी रेनबो स्कूल बसवर शोपियानमध्ये दगडफेक केली आहे. ज्यात दुस-या इयत्तेत शिकणारा मुलगा रेहान जखमी झाला आहे. या आरोपींना कायद्याचा सामना करावा लागणार आहे. रेहानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दगडफेक करणारे आता लहान मुलांना निशाणा बनवत आहेत, हा वेडेपणा आहे, असंही एसपी वैद्य म्हणाले आहेत.