सुरक्षा दलांना मोठं यश, जैशच्या कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:28 PM2021-03-15T15:28:02+5:302021-03-15T15:30:49+5:30
Top Jaish commander Sajad Afghani killed in Shopian encounter : सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी ठार झाला आहे. सज्जाद अफगाणीचे खरे नाव विलायत आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी ठार झाला आहे. सज्जाद अफगाणीचे खरे नाव विलायत आहे. काल सुरक्षा दलाने स्थानिक काश्मिरी दहशतवादी जहांगीरला ठार केले होते. जम्मू काश्मीर पोलीसचे आयजी विजय कुमार यांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी सुरक्षा दलाचे अभिनंदन केले. (J&K: Top Jaish commander Sajad Afghani killed in Shopian encounter)
जम्मू-काश्मीरमधील शोपियान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
JeM commander Sajjad Afghani, who was killed in Shopian encounter, was involved in the recruitment of new youths into terrorism. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) March 15, 2021
सज्जाद जैशसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सज्जाद याच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, तो स्थानिक नागरिक असून बर्याच वर्षांपासून कार्यरत होता. 2008 मध्ये प्रथमच त्याचे नाव उघडकीस आले होते. यानंतर 2015 मध्ये सक्रिय दहशतवादाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता, असे प्रामुख्याने समोर आले होते.