जम्मू काश्मीर : हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 07:39 AM2017-09-11T07:39:11+5:302017-09-11T08:09:09+5:30
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलातील जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
श्रीनगर, दि. 11 - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलातील जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे होते. दरम्यान, एक दहशतवाद्याला अटकही करण्यात आली आहे. यापूर्वी 2 सप्टेंबरला कुलमाग जिल्ह्यातील बेहीबागमध्येही जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. बेहीबागमध्ये ठार करण्यात आलेला हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा असल्याची माहिती समोर आली होती. त्याचे नाव इश्फाक पद्दार असे होते. पद्दार हा लेफ्टनन्ट उमार फयाज यांच्या हत्येत सहभागी असल्याचंही बोलले जात आहे.
तर दुसरीकडे, काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर तिस-या दहशतवाद्यानं आत्मसर्मपण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील बरबग परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. परिसराला जवानांनी घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. आदिल असं शरणागती पत्कारलेल्या दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती आहे. चकमकीत ठार मारला गेलेला दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव तारिक अहमद दार आहे. आत्मसर्मपण केल्यास तुला मारणार नाही, अशी शाश्वती पोलिसांनी दिल्यानंतर घराच्या ढिगाऱ्याआड लपलेला आदिल बाहेर आला. त्यानंतर त्याने आपली एके-47 रायफल जमिनीवर ठेवली आणि सुरक्षा दलांकडे स्वतःला स्वाधीन केले. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये आदिलचा सहभाग होता. आदिल शोपियान जिल्ह्यातील चिटीपोरामध्ये राहणारा आहे. अटक करण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
J&K: Two Hizbul terrorists killed in an encounter with security forces in Kulgam, one terrorist arrested.
— ANI (@ANI) September 11, 2017
J&K: Two Hizbul terrorists killed in an encounter with security forces in Kulgam, one OGW apprehended. AK 47 rifle & Insas rifle recovered pic.twitter.com/ioHOD6LMMk
— ANI (@ANI) September 11, 2017
9 सप्टेंबर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इटूचा एन्काऊंटर
12 ऑगस्ट :दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा केला. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले होते. अकोल्यातील जवान सुमेध गवई आणि तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांना वीरमरण आले.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
4 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले. यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.
दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद
3 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा
1 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.