"जनतेचा कौल विरोधात गेला तर भाजपने..."; बहुमताजवळ जाताच ओमर अब्दुल्लांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:16 AM2024-10-08T11:16:03+5:302024-10-08T11:17:21+5:30

Omar Abdullah : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी निवडणुकीत विजयाची आशा व्यक्त केली आहे.

JKNC Omar Abdullah big statement regarding the establishment of power in Jammu and Kashmir | "जनतेचा कौल विरोधात गेला तर भाजपने..."; बहुमताजवळ जाताच ओमर अब्दुल्लांनी दिला इशारा

"जनतेचा कौल विरोधात गेला तर भाजपने..."; बहुमताजवळ जाताच ओमर अब्दुल्लांनी दिला इशारा

Jammu and Kashmir Assembly Election Result 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांवर सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये एक्झिट पोलचे निकाल चुकीचे असल्याचे दिसून येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. जनतेचा कौल त्यांच्या विरोधात असेल तर भाजपने कोणतीही खेळी करू नये, असा इशारा ओमर अब्दुल्ला यांनी दिला आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. आजच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला मिळणार आणि कोणाच्या पदरी निराशा पडणार हे स्पष्ट होणार आहे. तब्बल १० वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस-एनसी आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर भाजप पिछाडीवर आहे. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना भाजपवर निशाणा साधला आहे.

"मला आशा आहे की आम्ही जिंकू. हा निर्णय जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी घेतला आहे आणि आज दुपारपर्यंत ते कळेल. या निवडणुकीच्या निकालामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. जनतेचा कौल भाजपच्या विरोधात असेल तर त्यांनी कोणतीही खेळी खेळू नये.  राजभवनने कोणताही हस्तक्षेप न करता लोकांचा कौल स्वीकारावा,” असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

काँग्रेससोबतच्या युतीवर काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?

"निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या पक्षाने काँग्रेससोबत युती केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत. पण सत्तेसाठी पीडीपीसारख्या पक्षांचा पाठिंबा लागेल की नाही हे सांगणे घाईचे ठरेल. त्यांच्याकडून ना आम्ही कोणाचा पाठिंबा मागितला आहे ना आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. निकाल येऊ द्या. आत्ता आम्हाला (त्यांच्या पाठिंब्याची) गरज नाही. निकाल आल्यानंतर चर्चा करू."," असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर निवडणूक आयोगाने सकाळी दहा वाजता जाहीर केलेल्या ९० विधानसभा जागांच्या कलानुसार, जेकेएनसी-काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. जेकेएनसी ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८, भाजप २८, पीडीपी ३, जेपीसी २, सीपीआय(एम) आणि अपक्ष उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत.
 

Web Title: JKNC Omar Abdullah big statement regarding the establishment of power in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.