जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:31 AM2021-06-30T06:31:06+5:302021-06-30T06:31:42+5:30
पंतप्रधानांची गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांशी चर्चा
जम्मू : कालूचक- रत्नुचक सैन्य तळावर उड्डाण करणाऱ्या ड्रोनचा धोका विफल केल्यानंतर जम्मूच्या बाहेरील भागात मंगळवारी पुन्हा एकदा ड्रोन दिसून आले. सूत्रांनी सांगितले की, हे ड्रोन रत्नुचक - कुंजवानी भागात हे ड्रोन तीन वेळा दिसले. जम्मूतील या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित होती.
प्रथम रत्नुचक भागात रात्री १.०८ वाजता, त्यानंतर कुंजवानी भागात पहाटे ३.०९ आणि ४.१९ वाजता ड्रोन दिसले. अर्थात, सैन्याकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा संशय पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हे ड्रोन सीमेपलीकडून उडून आले असावेत आणि स्फोटके टाकून पळाले असावेत.
तपास एनआयएकडे
जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. भारतीय हवाई दलाच्या तळावर शनिवारी रात्री ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. यात दोन जवान जखमी झाले. जम्मू विमान तळ आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील अंतर १४ किमीचे आहे. या परिसरात कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही.