झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का; भाजपात सामील झाल्या सीता सोरेन, काही तासांपूर्वी सोडला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 03:15 PM2024-03-19T15:15:59+5:302024-03-19T15:17:40+5:30
JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून सीता सोरेन यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
JMM Jharkhand: झारखंडमध्ये सत्ताधारी JMM(झारखंड मुक्ती मोर्चा)ला मोठा धक्का बसला आहे. JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन, यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप झारखंडचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सीता सोरेन कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे, सोरेन यांनी काही तासांपूर्वी JMM सोडण्याची घोषणा करत आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
#WATCH | Delhi: Former JMM MLA and sister-in-law of former Jharkhand CM Hemant Soren- Sita Soren joins BJP. pic.twitter.com/HiG9Nlsm8I
— ANI (@ANI) March 19, 2024
'भाजपची ताकद वाढली'
सीता सोरेन यांना भाजपात सामावून घेताना विनोद तावडे म्हणाले की, झारखंडच्या मोठ्या नेत्या सीता सोरेन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने राज्यात पक्षाची ताकद वाढली. लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम तिथे दिसून येईल. आदिवासींसाठी त्या आपली सर्व शक्ती पणाला लावतील. भारतीय जनता पक्षात त्यांचे स्वागत करतो. तर, लक्ष्मीकांत वाजपेयी म्हणाले, झामुमोमध्ये असतानाही सीता यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला होता. सीता सोरेन हा संघर्षाचा समानार्थी शब्द आहे.
'झारखंड विकासापासून कोसो दूर'
यावेळी सीता सोरेन म्हणाल्या, आज मी एका विशाल कुटुंबात सामील होत आहे. नरेंद्र मोदींचे विचार, त्यांची विकासकामे देशातील लोक पाहत आहेत. आज प्रत्येकाला या कुटुंबाचा भाग व्हायचे आहे. झारखंडमध्ये मी अनेक संघर्ष केले. 14 वर्षे झारखंड मुक्ती मोर्चात राहिले. माझे सासरे शिबू सोरेन आणि पती दुर्गा सोरेन यांच्या नेतृत्वात वेगळे राज्य निर्माण झाले. राज्याच्या विकासकामांसाठी त्यांनी संघर्ष केला. पण, माझ्या पतीचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आमदार झाले. पण जे उद्दिष्ट गाठायला हवे होते, ते साध्य होऊ शकले नाही. झारखंड अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. झारखंड वाचवायचा आहे, म्हणूनच मी मोदीजींच्या कुटुंबात सामील झाले, अशी प्रतिक्रिया सीता सोरेन यांनी दिली.