झामुमोच्या आमदारास अटक
By admin | Published: June 12, 2016 03:50 AM2016-06-12T03:50:24+5:302016-06-12T03:50:24+5:30
झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान होत असतानाच शनिवारी येथे एका जुन्या फौजदारी प्रकरणात झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार चमरालिंडा यांना अटक करण्यात आली.
- सुरक्षा दलासोबत बाचाबाचीचे प्रकरण
रांची : झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान होत असतानाच शनिवारी येथे एका जुन्या फौजदारी प्रकरणात झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार चमरालिंडा यांना अटक करण्यात आली.
विधानसभेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चमरालिंडा यांना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ते विधानसभा परिसरात प्रवेश करीत असताना अटक करण्यात आली. २०१३ साली सुरक्षा दलासोबत झालेल्या बाचाबाचीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयालाही याबाबत सूचना दिली असून कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, झामुमोचे उमेदवार बसंत सोरेन यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांपैकी दोघे बडकागावच्या निर्मलादेवी आणि पांकी विधानसभा मतदारसंघात अलीकडेच पोटनिवडणुकीत विजयी झालेले देवेंद्र सिंग यांच्या नावेसुद्धा अटक वॉरंट काढण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीत सोरेन यांच्यासाठी या तीनही आमदारांची मते महत्त्वाची होती. यांची मते न मिळाल्यास भाजपाचे दुसरे उमेदवार महेश पोद्दार यांची स्थिती मजबूत होऊ शकते. (वृत्तसंस्था)