प्रख्यात कवी गुलझार, महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 05:15 AM2024-02-18T05:15:56+5:302024-02-18T05:16:55+5:30
गुलझार यांच्या विविध चित्रपटांतील गीतांसह उर्दू साहित्याचा सन्मान; रामभद्राचार्यांच्या संस्कृत भाषेतील साहित्यकृतीचा होणार यथोचित गौरव
नवी दिल्ली : प्रख्यात उर्दू कवी, चित्रपट गीतकार, दिग्दर्शक अशा विविध पैलूंनी आपली झळाळती कारकीर्द घडविणारे गुलझार तसेच संस्कृतचे महापंडित, शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखक असलेले जगद्गुरू रामभद्राचार्य या दोन मान्यवरांना २०२३ च्या ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ही घोषणा केली.
साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान
ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे की, २०२३च्या ज्ञानपीठ पुरस्कारांसाठी उर्दू व संस्कृत या भाषांतील दोन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
२०२२ साली ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला होता. मावजो यांनी कोकणी भाषेत साहित्यनिर्मिती केली. देशातील साहित्यक्षेत्रात ज्ञानपीठ हा सर्वोच्च सन्मान असल्याचे
मानण्यात येते.
पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते
nसाहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असे मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे २०२३ सालातील मानकरी असलेले गुलझार यांनी हिंदी चित्रपटांसाठीही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंद’, ‘ओंकारा’, ‘खामोशी’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘दो दूनी चार’, ‘बंटी और बबली’, अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत.
n‘धुआँ’ या कथासंग्रहासाठी २००२ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००४ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ व २०१३ साली त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तसेच चित्रपटसृष्टीतील कामगिरीसाठी त्यांना आजवर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
तब्बल २२ भाषांवर प्रभुत्व
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक व प्रमुख रामभद्राचार्य हे आध्यात्मिक गुरू आहेत. संस्कृतचे महापंडित असलेल्या रामभद्राचार्य यांनी १००हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ते रामानंद संप्रदायाचे आहेत.
विशेष म्हणजे २२ भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहेत. चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे ते संस्थापक व आजीवन कुलपतीदेखील आहेत. २०२३ सालासाठीच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे तेही मानकरी ठरले आहेत.