जेएनयूत सापडले पिस्तूल, आठ काडतुसे
By admin | Published: November 8, 2016 03:13 AM2016-11-08T03:13:48+5:302016-11-08T03:13:48+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असलेल्या बेवारस पिशवीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असलेल्या बेवारस पिशवीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. एका सुरक्षारक्षकाला सोमवारी पहाटे दोन वाजता काळ्या रंगाची ही पिशवी आढळून आली. या पिशवीत ७.६५ पिस्तूल, ७ जिवंत काडतुसे आणि स्कू्र ड्रायव्हर होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सुरक्षारक्षकाने या पिशवीची माहिती जेनएयू प्रशासनाला दिली आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आईला घेतले ताब्यात
जेएनयूचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमद याची आई, नातेवाईक व विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. अहमदचे कुटुंबीय आणि विद्यार्थी इंडिया गेट येथे निदर्शने करण्यास गोळा झाले होते; मात्र निदर्शने सुरू करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठाण्यात नेण्यात आले. नजीबची आई फातिमा नफीस यांना मायापुरी पोलीस ठाण्यात, त्याची बहीण सदाफ मुशर्रफ आणि इतर कुटुंबियांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात, तर निदर्शक विद्यार्थ्यांना साऊथ एव्हेन्यू पोलीस ठाण्यात नेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)