JNU Attack: 'हिंसाचार घडत असताना पोलिसांना बघ्याची भूमिका घेण्याचे आदेश होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:03 PM2020-01-09T17:03:41+5:302020-01-09T17:04:04+5:30
त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनाबद्दल पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. कारण केंद्र सरकार दिल्ली पोलिसांना ज्याप्रकारे आदेश देते त्याप्रमाणे ते काम करतात. त्यामुळे दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराच्या घटनामध्ये पोलिसांची चूक नसल्याचे केजरीवाल म्हणाले आहे.
दिल्लीतील जे काही घडत आहे त्याबद्दल पोलिसांना मी दोषी समजत नाही. कारण हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर घडू द्या, हल्लेखोरांना हल्ले करून जाऊ द्या त्यांनतर तुम्ही घटनास्थळी पोहचले पाहिजे, असे आदेश पोलिसांना वरून दिले जात असल्याचे आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्ली पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. त्यांनी विचार केला तर, राज्यातील गुन्हेगारीला ते लगाम लावू शकतात. मात्र पोलिसांना गुन्हा घडत असताना कारवाई न करण्याचे आदेश वरून दिले जात आहे. त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महत्वाच्या पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाली आहेत. तर दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या ह्ल्ल्याची घटना या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरत आहे. यावरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे.