JNU प्रकरण : कन्हैया कुमारच्या अडचणीत वाढ
By admin | Published: June 12, 2016 11:52 AM2016-06-12T11:52:00+5:302016-06-12T11:52:00+5:30
भारतविरोधी घोषणाबाजी झाल्यासंबंधीचे व्हिडिओ फुटेज खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ : ९ फेब्रुवारी २०१६ रोजी दहशतवादी अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा करत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणाबाजी झाल्यासंबंधीचे व्हिडिओ फुटेज खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा प्रकरणात कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशविरोधी घोषणांचा व्हिडीओ हा खरा असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही, असा दावा सीबीआयच्या फॉरेन्सिक लॅब केला आहे. सीबीआयच्या प्रयोगशाळेतून दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडे ८ जूनला पाठविण्यात आलेल्या अहवालात हे प्राथमिक फुटेज सत्य असल्याचे म्हटले आहे.
एका हिंदी वाहिनीवरून घेण्यात आलेले हे फुटेज तपासणीसाठी सीबीआयच्या दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. जेएनयूमधील विद्यार्थी उमर खलिद याच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा एक गट भारतविरोधी घोषणा देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सीबीआयने हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. या आधारावर दिल्ली पोलिस जेएनयू प्रकरणाचा अधिक तपास करणार असल्याचे कळत आहे.