जेएनयूतील वसतिगृहांची भल्या पहाटे झाडाझडती, मुलींच्या खोल्यांमध्ये घुसले सुरक्षा रक्षक, विद्यार्थ्यांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:10 AM2017-10-19T02:10:22+5:302017-10-19T02:10:26+5:30
विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका अधिव्याख्यासह सुरक्षारक्षकांनी मुले आणि मुलींच्या खोल्यांची झाडाझडती घेतली, असा आरोप आहे.
मुलांच्या खोलीत अनेक मुली आढळल्याचे वृत्तपत्राच्या ठळक बातम्यांत म्हटले आहे. जेएनयूचे अधिव्याख्याता बुद्ध सिंह यांच्या नेतृत्वाखाली २० ते २५ सुरक्षारक्षकांनी ५ आॅक्टोबर रोजी मुलीच्या वसतिगृहासह विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहात घुसून झडती घेतली, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. कुलगुरू व रजिस्ट्रार यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही.
विद्यापीठ परिसरातील विविध वसतिगृहांचे अधीक्षकही छापा घालण्यास आले होते. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी आत घुसण्याआधी दरवाजे ठोठावण्याचे सौजन्यही दाखविले नाही, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी सरचिटणीस सतरूपा चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. मुली झोपत असताना त्यांच्या खोल्यांत घुसून धाडी घातल्या, असा आरोपही त्यांनी केला. कपाटे उघडण्यात आली आणि नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जागीच दंडही ठोठावला.
मागील वर्षापासून विद्यापीठ प्रशासनाकडून असले प्रकार होत आहेत. जेएनयूविरुद्ध द्वेषभावनेला चिथावणी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस दुग्गीरला श्रीकृष्ण यांनी म्हटले आहे. धाडींविषयी वसतिगृहाच्या निर्वाचित पदाधिकाºयांना का अंधारात ठेवण्यात आले, अशी विचारणा करणारा ठराव पेरियार वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांनी केला आहे.
हा सामाजिक दहशतवाद
अ. भा. विद्यार्थी परिषदेनेही या धाडीबद्दल विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार केला आहे. वसतिगृह तपासणीच्या नावाखाली विद्यापीठ प्रशासन नैतिकता रक्षणाचा आव आणून असला अत्याचार करीत आहे, असे अभाविपने म्हटले आहेत. जेएनयू टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा आयेशा किडवाई यांनी हा प्रकार सामाजिक दहशतवाद असल्याचे म्हटले आहे.