भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:53 AM2020-01-08T08:53:23+5:302020-01-08T08:57:09+5:30
जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानं दीपिकाविरोधात भाजपा आक्रमक
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल संध्याकाळी भेट घेतली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं यावेळी दीपिकानं म्हटलं. मात्र दीपिकानं माध्यमांशी बोलणं टाळलं. पावणे आठ वाजता जेएनयूच्या परिसरात पोहोचलेली दीपिका जवळपास १० मिनिटं आंदोलनस्थळी उपस्थित होती. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार 'जय भीम'च्या घोषणा देत होते.
दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकानं तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचं समर्थन केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असं आवाहन भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केलं आहे. तर अभिनेत्री स्वरा भास्करनं दीपिकाचं कौतुक केलं. दीपिकानं जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.
RT if you will Boycott Movies of @deepikapadukone for her Support to #TukdeTukdeGang and Afzal Gang pic.twitter.com/LN5rpwjDmT
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 7, 2020
दिल्ली पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व्हर रुममध्ये तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात आइशी घोष जखमी झाली. तिच्या डोक्याला जखम झाली. त्यातून बराच रक्तस्रावदेखील झाला. घोषसोबतच साकेत मून, सतीश यादव, सारिका चौधरी आणि इतरांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३४१, ३२३ आणि ५०६ च्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी माक्सधारी व्यक्तींनी तोडफोड केली. हिंदू राष्ट्र दलानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दलाचे प्रमुख भूपेंद्र तोमर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. देशविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठी जेएनयूमध्ये तोडफोड केल्याचं म्हणत त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र अद्याप तोमर किंवा त्यांच्या संघटनेतील कोणाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.