‘जेएनयू’ वादाने झाकोळली सर्वपक्षीय बैठक
By admin | Published: February 17, 2016 02:58 AM2016-02-17T02:58:15+5:302016-02-17T02:58:15+5:30
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला.
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वाद उफाळून आला. विरोधी पक्षांनी अटकेतील विद्यार्थी संघाच्या नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याच्या निर्णयावर रोष व्यक्त केला, तर विद्यार्थ्यांनी केलेली घोषणाबाजी आक्षेपार्ह असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट आणि त्यापाठोपाठ उद्भवलेला जेएनयूमधील वाद या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी केंद्र सरकारला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
त्यामुळेच संसदेच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयूमधील वादावर चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शविली. बैठकीनंतर संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी संसदेचे कामकाज सुरळीत व्हावे यावर सर्वसहमती झाल्याचा दावा केला. जेएनयू वादावर भाजपाकडून काँग्रेसवर देशद्रोह्णांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात येत असतानाच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, देशाचे ऐक्य आणि राज्यघटनेला लक्ष्य करून घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी काँग्रैसला अजिबात सहानुभूती नाही. मात्र अटकेतील नेता कन्हय्याकुमार याच्याविरुद्ध देशद्रोहाचा कुठलाही पुरावा नाही.
देशद्रोही आणि हिटलर
गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपा नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल होणाऱ्या देशद्रोही शब्दाच्या वापरावर तीव्र आक्षेप घेतला. दुसरीकडे वेंकय्या नायडू यांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधानांना ‘हिटलर’ हे संबोधन कसे लावले जाते असा सवाल केला. सर्व पक्षांनी संयम बाळगावा,असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
विरोधकांद्वारे उपस्थित मुद्दे
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संमत करण्याकडे लक्ष वेधले.
महत्त्वानुरुप विधेयके संमत व्हावीत आणि त्यासाठी सरकारने संसदेतील कोंडी फोडण्याच्या दृष्टीने वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले.
काँग्रेस नेत्यांनी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचाही मुद्दा बैठकीत उपस्थित केला. अरुणाचल प्रदेशमधील राजकीय कोंडीवरही बैठकीत चर्चा झाली.
मारहाण प्रकरणी आज सुनावणी
दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात पत्रकार, जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांना वकिलांच्या संघटनेने मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि पोलिसांच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज बुधवारी सुनावणी करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)