जेएनयू: संशयित आरोपींचे मोबाईल ताब्यात घ्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 03:16 AM2020-01-15T03:16:08+5:302020-01-15T03:16:20+5:30
१३४ कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप उपलब्ध नाही
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी दोन व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संशयित विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिले. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप, गुगलला पोलिसांकडून मागण्यात आलेले पुरावे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
‘युनिटी अगेंस्ट लेफ्ट’, ‘फ्रेंड्स आॅफ आरएसएस’ या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपवरील विद्यार्थी या हिंसाचारात सहभागी असण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांच्याकडून या हल्ल्याबाबत आणखी पुरावे मिळू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद कुमार यांना पोलिसांना पुरावे सादर करून संपूर्ण सहकार्य करण्यास सांगितले आहे.
जेएनयूच्या एक हजार एकर परिसरातील १३४ कॅमेरांचे सीसीटीव्ही फुटेजही अद्याप उपलब्ध झालेले नाही. प्राध्यापक अमित परमेश्वरन, अतुल सूद आणि शुक्ला विनायक सावंत यांनी दोन्ही व्हॉट्सअॅप ग्रुपवरील पुराव्यांच्या सुरक्षेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दोन आरोपींची चौकशी मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजन यांच्यासह जखमी विद्यार्थ्यांची चौकशी केली. पोलिसांनी सोमवारी आयेशी घोषसह तिघांची चौकशी केली होती. घोष, तालुकदार, रंजन, दोलन सामंत, व्हास्कर विजय, चुनचुनकुमार आणि पंकज मिश्रा यांची संशयीतांमध्ये नावे आहेत.
अमित भादुडींनी ‘एमिरेट्स’ पद सोडले
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमित भादुडी यांनी जेएनयू विद्यापीठ प्रशासनावर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करताना एमिरेट्स प्राध्यापकपद सोडले आहे.
कुलगुरूंनी घेतली आयुक्तांची भेट
‘जामिया’च्या कुलगुरु नजमा अख्तर यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची भेट घेतली. कॅम्पसमधील पोलीस कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी कॅम्पसमध्ये विना परवानगी प्रवेश केला, असा आरोपही त्यांनी केला आहे.