जेएनयूतील विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांचा लाठीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 06:07 AM2019-11-12T06:07:00+5:302019-11-12T06:07:03+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाच्या वसतिगृह शुल्कवाढ आणि काही विद्यार्थ्यांवर निर्बंध लादण्याच्या धोरणांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाच्या वसतिगृह शुल्कवाढ आणि काही विद्यार्थ्यांवर निर्बंध लादण्याच्या धोरणांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ सुरू असताना बाहेर विद्यार्थी आंदोलन करीत होते.
सभागृहात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आणि त्यांना रोखणारे पोलीस यांच्यात जोरदार संघर्ष झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांनी लाठीमार व पाण्याचा माराही केला. आंदोलनामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा तास अडकले होते. वसतिगृहाचे वाढवलेले शुल्क आणि इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे १३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. समारंभ सुरू असलेल्या एआयसीटीईच्या सभागृहात जाण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित होते. सुरक्षा रक्षकांनी एआयसीटीईच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. एआयसीटीईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेड्स लावून शेकडो पोलीस उभे होते.
>आंदोलनामुळे वाहतूककोंडी
बाबा गंगनाथ मार्ग ते जेएनयू या मार्गावर आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्याचप्रमाणे नेल्सन मंडेला मार्गावरही वसंत विहार ते वसंत कुंज या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.