‘जेएनयू’ विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा रोखला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 01:47 AM2019-11-19T01:47:18+5:302019-11-19T01:47:42+5:30
वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ तीन आठवड्यांपासून आंदोलन
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन सोमवारी संसद भवनाकडे आपला मोर्चा वळविला; पण पोलिसांनी त्यांना विद्यापीठ परिसराच्या आतच रोखले. वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ गत तीन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे संसदेचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. जोपर्यंत सरकार शुल्कवाढ मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे या विद्यार्थींनी स्पष्ट केले आहे.
या विद्यार्थ्यांना शेकडो पोलिसांनी बाबा गंगनाथ मार्गावरच अडविले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर ६०० मीटर अंतरावर या विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी जागेवरच रोखले.
वसतिगृहाच्या नियमावलीविरुद्ध हे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. यात शुल्कवाढ, ड्रेस कोड आणि येण्या-जाण्याची वेळ याबाबत नियम आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष एन.साई बालाजी म्हणाले की, संसदेकडे शांततेत जाणारा हा मोर्चा पोलिसांनी
रोखला.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केली समिती
जेएनयूमधील कार्यप्रणाली सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एचआरडीचे सचिव आर. सुब्रह्मण्यम म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यातून जेएनयूचे कामकाज सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सल्ला देण्यासाठी सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
यात यूजीसीचे माजी अध्यक्ष व्ही. एस. चौहान, एआयसीटीई अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे आणि यूजीसी सचिव रजनीश जैन यांचा समावेश आहे. ही समिती विद्यार्थी आणि प्रशासनसोबत तत्काळ चर्चा सुरू करेन.