JNU Violence: हिंसाचारामागे 'तो' व्हॉट्सअॅप ग्रुप; 7 जणांची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 01:40 PM2020-01-12T13:40:36+5:302020-01-12T13:43:13+5:30
ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य; लवकरच चौकशी होणार
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराची योजना आखण्यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. या माध्यमातूनच हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. दिल्ली पोलिसांना या ग्रुपमधील ७ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. याआधी या प्रकरणात पोलिसांना ३७ जणांची ओळख पटली आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य आहेत. यापैकी ४४ जणांची ओळख पटली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जेएनयूवरील हिंसाचाराबद्दल 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीनं एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. हिंसाचारामागे एक व्हॉट्सअॅप ग्रुप असल्याची माहिती स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली. हिंसाचाराची संपूर्ण आखणी याच ग्रुपमध्ये करण्यात आली. युनिटी अगेन्स्ट लेफ्ट असं या ग्रुपचं नाव आहे. या ग्रुपमधील ४४ जणांची ओळख पटवण्यात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला यश आलं आहे. या सगळ्यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेनं दिली आहे.
जेएनयूमध्ये हिंसाचार कसा झाला, त्यासाठीची योजना कशी आखण्यात आली, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, याची माहिती स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे. अक्षत अवस्थी नावाच्या विद्यार्थ्यानं जेएनयू हिंसाचाराबद्दलची संपूर्ण माहिती स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली. आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असल्याची कबुलीदेखील अक्षतनं व्हिडीओमध्ये दिली. यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अक्षतला चौकशीसाठी बोलावलं आहे.
याआधी हिंसाचार प्रकरणातील ९ जणांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यांना चौकशीसाठी नोटिसदेखील पाठवण्यात आली आहे. या ९ आरोपींमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषचा समावेश आहे. महिला पोलीस अधिकारी तिची चौकशी करतील. या प्रकरणात आतापर्यंत १३ सुरक्षा कर्मचारी आणि ५ विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे.