जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:19 AM2023-08-01T09:19:19+5:302023-08-01T09:21:19+5:30
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे.
एस. पी. सिन्हा -
पाटणा : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची ६ कोटी २ लाखांची मालमत्ता जप्त करून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे.
आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव, मिसा भारती, हेमा यादव आणि इतर आरोपींची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी ईडीने बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील मालमत्ता जप्त केल्या. पाटणा येथील बिहटा, महुआबाग, दानापूर येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, दिल्लीतील ‘डी’ ब्लॉकमधील संपत्ती आणि गाझियाबादमधील मालमत्ता जप्त केली.
काय आहे प्रकरण?
- २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेमंत्री असताना त्यांनी बेकायदेशीरीत्या एका खासगी कंपनीला भुवनेश्वर आणि रांची येथे हॉटेल चालवण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात या कंपनीने त्यांना पाटना येथे ३ एकर जमीन दिली होती.
- याप्रकरणी सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.