कौशल विकास केंद्र सुरू करूनही नोकरीसाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:07 AM2018-06-01T05:07:35+5:302018-06-01T05:07:35+5:30
केंद्रातील चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपा गुंग
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : केंद्रातील चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपा गुंग असला तरी नोकरशाहीचा त्रास सोसत देशभरातील शेकडो युवक कडक उन्हात इकडे-तिकडे भटकत आहेत.
बेरोजगारी दूर करण्यासाठी राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (पीएमकेवीवाय) कौशल विकास केंद्रावर लाखों रुपयांची गुंतवणूक करून बसलेले हे युवक बेरोजगारीला तोंड देत आहेत. हे लोक सरकारकडे काम मागत आहेत. परंतु आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळत नाही. पीएमकेवीवायअंतर्गत केंद्र सुरू करणारे सिरसाचे राकेश यांनी सांगितले की, देशभरात २६०० केंद्रांना सगळे निकष पूर्ण केल्यानंतरही कोणतेही काम दिले जात नाही. सगळ्या नियमांचे पालन केल्यानंतरच आम्हाला मान्यता तर दिली गेली. परंतु १५ ते २० लाख रुपये या केंद्रावर गुंतवल्यानंतरही आम्ही बेरोजगारच आहोत. बँकेची कर्जफेड तर दूरच, कर्मचाºयांचे वेतन, वीज बिल व इतर खर्चाचे ओझे असह्य झाले आहे.
भाजपा नेत्याचे हात वर : थकलेले बेरोजगार युवक अखेर गुरुवारी भाजपा मुख्यालयात आले. तिथे त्यांनी कैलाश विजयवर्गीय यांना आपले दु:ख सांगितले. या बेरोजगारांनी सांगितले की, योजनेची माहिती असल्याचाच विजयवर्गीय यांनी इन्कार केला व आम्हाला आपापल्या राज्यातील प्रभारींची भेट घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.