कुठं नेऊन ठेवलाय 'भारत माझा', बेरोजगारी दरात गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:22 AM2019-03-06T11:22:34+5:302019-03-06T11:26:46+5:30

सीएमआयई या सस्थेकडून प्रत्येक महिन्याला बेरोजगारीसंदर्भातील अहवाल सादर करण्यात येतो.

jobless rate climbed to 7.2 percent, unemployment increase in india | कुठं नेऊन ठेवलाय 'भारत माझा', बेरोजगारी दरात गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक वाढ 

कुठं नेऊन ठेवलाय 'भारत माझा', बेरोजगारी दरात गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक वाढ 

Next

नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीचा दर वाढला असून गेल्या 2.5 वर्षातील हा बेरोजगारीचा सर्वाधिक आकडा असल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच सीएमआयईच्या अहवालानुसार फेब्रुवारी 2019 मध्ये मासिक बेरोजगारी दरात वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 5.9 टक्के होता, तो यंदा 7.2 टक्के एवढा वाढला आहे.

सीएमआयई या सस्थेकडून प्रत्येक महिन्याला बेरोजगारीसंदर्भातील अहवाल सादर करण्यात येतो. अनेक अर्थतज्ञांच्या टीमकडून या संस्थेच्या अहवालाची पडताळणी होत असते. त्यानुसार, फेब्रुवारी 2019 चा बेरोजगारी अहवाल या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचं प्रमाण अधिकच वाढलं असून फेब्रुवारी महिन्यातील बेरोजगारी वृद्धीचा दर 7.2 हा गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक ठरला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये बेरोजगारी वृद्धीचा दर 5.9 टक्के एवढा होता. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, बेरोजगारीची वाढती आकडेवारी मोदी सरकारला धोक्याची घंटा असणार आहे. यापूर्वीही एका अहवालातून गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात असल्याचं स्पष्ट झालं होतं. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने हा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर, मोदी सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर, मोदी सरकारने हा अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयाचा लहान-सहान उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळेही बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत होते. 

दरम्यान, सीएमआयईची आकडेवारी ही सरकारकडून प्रसिद्ध होणाऱ्या बेरोजगारीच्या आकडेवारीपेक्षा विश्वसनीय आहे, असे काही अर्थतज्ञांचे म्हणण असल्याचे  न्यूज 24 या वेबसाईटने म्हटलं आहे. सध्या देशातील 34 कोटी तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, असेही या वेबसाईटकडून सांगण्यात आले आहे.  
 

Web Title: jobless rate climbed to 7.2 percent, unemployment increase in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.