Blackbuck poaching case :'मी निर्दोष आहे', निकालापूर्वी सलमानची न्यायाधीशांसमोर विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 12:08 PM2018-04-05T12:08:18+5:302018-04-05T12:08:18+5:30
सलमान खानने कोर्टरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभं राहून निर्दोष असल्याचं म्हटलं.
जोधपूर- 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. कोर्टाने सलमानला दोषी ठरविलं असून सलमानव्यतिरिक्त सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, सैफअली खान यांनी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे. गुरूवारी (मार्च 5) सकाळी कोर्टात पोहचल्यावर सलमान खानने कोर्टरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभं राहून निर्दोष असल्याचं म्हटलं. 'मी पूर्णपणे निर्दोष आहे', असं सलमान कोर्टारूममध्ये उभं राहून म्हणाला. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान कोर्टात पोहचला होता. सलमान खानशिवाय इतर कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप कोर्टात फेटाळल्याचं समजतं आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सुनावणी सुरू होताच सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे विचारण्यात आले होते. पण त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. अन्य सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. शिकार करण्यासाठी सलमानला भरीस घातल्याचा आरोप या कलाकारांवर ठेवण्यात आला होता. परंतु न्यायालयाने सलमान खान यानेच काळवीटांची शिकार केल्याचे म्हटले. इतर कलाकार केवळ त्याठिकाणी हजर होते. त्यामुळे सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला.
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमानने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते. मात्र, अभियोजन पक्षाच्या कथनात अनेक त्रुटी असून या प्रकरणातील आरोप सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले आहे, असा दावा सलमानच्या वकिलांनी कोर्टात केला होता. या प्रकरणात किमान १ वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.