जोधपूरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:06 PM2022-10-08T18:06:54+5:302022-10-08T18:08:36+5:30
Rajasthan: मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील मगरा पुंजला भागातील कीर्ती नगरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत.
जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे येथील कीर्तीनगरचा संपूर्ण परिसर हादरला.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील मगरा पुंजला भागातील कीर्ती नगरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत. या स्फोटात अनेक वाहनेही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या गॅस सिलिंडरचा स्फोटाच्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जोधपूरमधील मगरा पुंजला भागातील कीर्ती नगरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे 4 लोकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याची माहिती खूप दुःखदायक आहे. स्थानिक प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जोधपुर में मगरा पूंजला एरिया के कीर्ति नगर में गैस सिलेंडर फटने से 4 लोगों की मृत्यु एवं कई लोगों के घायल होने की जानकारी बेहद दुखद है। स्थानीय प्रशासन से पूरी घटना की जानकारी ली है एवं घायलों के समुचित उपचार के निर्देश दिए हैं।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) October 8, 2022
दरम्यान, या घटनेतील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक 80 टक्के भाजले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग होत असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.