जोधपुरी कचोरी व मिरची भजी यांनी तोडल्या मतभेदाच्या सीमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:42 AM2019-12-05T04:42:57+5:302019-12-05T04:45:02+5:30
एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : संसदेत अनेकदा एकमेकांवर आरोप व टीका करणारे विविध राजकीय पक्षांचे खासदार सभागृहातून बाहेर आल्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवतात. टीका, आरोप यांची कटुता कोणाच्याही मनात नसते. एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही.
असाच प्रकार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पाहायला मिळाला. अनेक खासदार सेंट्रल हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असताना माजी केंद्रीय मंत्री व राजस्थानचे खासदार पी. पी. चौधरी जोधपूरची खासियत असलेले कांद्याची कचोरी व मिरचीची भजी घेऊ न तिथे पोहोचले. त्यांनी हे खाद्यपदार्थ खासदारांच्या समोर ठेवले. त्या टेबलावर राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, खा. हेमामालिनी, खा. सुप्रिया सुळे आणि खा. कार्ती चिदम्बरम बसले होते. मनसोक्त गप्पा मारत या साऱ्यांनी कचोरी व भज्यांवर ताव मारला. खा. चौधरी तेवढ्यावरच थांबले नाहीत. अन्य टेबलांवरही त्यांनी कचोरी व भजी नेली. त्यापैकी एका टेबलापाशी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, खा. सुरेंद्र नागर व अन्य खासदार बसले होते. काही पत्रकारही सोबत होते.
बारीक कांदा आणि मोठाली मिरची
- जोधपूरची कांद्याची कचोरी व मिरचीची भजी जगभर प्रसिद्ध आहेत. सामान्य कचोरीच्या दुप्पट आकाराच्या असतात या कचोºया.
- या कचोऱ्यांच्या मसाल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालतात. त्यामुळे त्या अतिशय खमंग असतात. एक कचोरी खाल्ली तरी पोट भरते.
- मिरची भजीही जोधपूरचे वैशिष्ट्य. या मिरच्या नेहमीच्या मिरच्यांच्या दुप्पट आकाराच्या असल्या, तरी तिखट मात्र नसतात.
- भरपूर बेसनात भिजवलेली ही भजी सध्याच्या थंडीत खूपच मस्त वाटतात.