दिल्लीत दाखल होताच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटलेली चिमुकली कोण? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:03 PM2023-09-08T22:03:53+5:302023-09-08T22:06:31+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे दिल्लीतील पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.
Joe Biden In India: राजधानी दिल्लीत आयोजित G-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) दिल्लीत दाखल झाले आहेत. बायडेन यांचे पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जो बायडेन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित असलेल्या एका चिमुरडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, ती चिमुकली नेमकी कोण आहे?
जो बायडन विमानतळावर दाखल झाल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांसह अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटीदेखील (Eric Garcetti) त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून एरिक गार्सेटी यांची मुलगी माया (Maya Garcetti) आहे. माया गार्सेट्टीने जो बायडेन यांचे स्वागत केले. मायाला भेटून बायडेनदेखील खूप आनंदी दिसले. मायाला पाहताच त्यांनी तिला मिठीही मारली. माया आणि बायडेन यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
#WATCH | G-20 in India: US President Joe Biden arrives in Delhi for the G-20 Summit
— ANI (@ANI) September 8, 2023
He will hold a bilateral meeting with PM Narendra Modi today pic.twitter.com/IVWUE0ft7E
माया याआधीही चर्चेत आली
यापूर्वी एरिक गार्सेट्टी यांना अमेरिकेचे भारतातील राजदूत बनवल्यानंतर माया प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एरिक गार्सेटी यांना अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ दिली होती. त्यानंतर शपथ घेताना एरिक यांची मुलगी माया बायबल हातात घेऊन उभी होती.
एरिक गार्सेटी कोण आहे?
एरिक गार्सेट्टी हे सध्या नवी दिल्लीतील यूएस दूतावासात अमेरिकेचे राजदूत आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात रोड्स स्कॉलर होते आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्ही रिझर्व्हमध्ये अधिकारी म्हणूनही काम केले आहे. एरिक गार्सेट्टी हे जुलै 2013 ते डिसेंबर 2022 पर्यंत लॉस एंजेलिसचे 42वे महापौर होते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या लॉस एंजेलिसचे पहिले ज्यू महापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.