जोगींच्या पक्षामुळे चित्र पालटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 06:08 AM2016-06-11T06:08:30+5:302016-06-11T06:08:30+5:30
जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली
रायपूर : छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा काळ असला तरी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी अलीकडेच नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत केलेली घोषणा पाहता या राज्यातील राजकारणावर पडणाऱ्या संभाव्य प्रभावाची चर्चा होऊ लागली आहे. या राज्यात आजवर भाजप आणि काँग्रेसच्या द्विध्रुवीय राजकारणाचे प्राबल्य राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीत जोगींच्या नव्या पक्षाचा कितपत प्रभाव दिसून येणार याचे भाकीत सध्याच्या स्थितीत वर्तवणे अशक्य आहे, मात्र जोगींनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दिल्ली ते रायपूर अशी खळबळ उडविली असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.दीर्घ काळपासून सत्तेच्या दूर राहूनही जोगी समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला जोगींना अटकाव घालण्यासाठी डावपेच आखणे भाग पडणार आहे. राज्याला सशक्त विरोधकाची गरज असताना प्रदेश काँग्रेसला रमणसिंग यांच्या सरकारवर दबाव आणण्यात अपयश आल्यामुळे मला नवा पक्ष स्थापन करणे क्रमप्राप्त ठरल्याचे जोगी यांनी स्पष्ट केले आहे.
जोगींनी साथ सोडल्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या व्होट बँकेला हादरा बसेल. त्याचा फायदा भाजपला होईल. राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे भाजप चिंतेत पडली असे म्हणणे योग्य ठरणार नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल म्हणाले की, जोगींच्या नव्या पक्षामुळे काँग्रेसवर परिणाम होणार नाही. आमच्या पक्षाला छत्तीसगडमधील सत्ता भाजपकडून हिसकावून घेण्यास मदतच होईल. याआधीच्या निवडणुकीत भाजपने जोगींची नकारात्मक प्रतिमा समोर आणत यश मिळविले होते. या पार्श्वभूमीवर जोगी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे पक्ष पुनरुज्जीवित होईल. (वृत्तसंस्था)
>भाजपपुढे तिहेरी आव्हान
भाजपला २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जोगींच्या पक्षाकडून आव्हानाला तोंड द्यावे लागेल. सतनामी अनुसूचित जातींसह ५० टक्के लोकसंख्येच्या आदिवासींवर जोगींची चांगली पकड असल्याने ते भाजपसोबतच काँग्रेसचे गणित बिघडवू शकतात.
जोगींनी अनुसूचित जातींची मते खेचल्यास भाजपला हादरा बसेल. भाजपने अनुसूचित जातींच्या दहापैकी नऊ जागा काबीज केल्या असतानाही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना जोगींमुळे धोका निर्माण होईल असे वाटत नाही.
>मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस सत्ताधारी भाजपच्या कुशासनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार समर्थकासारखी काम करीत आहे. या राज्याला भ्रष्ट सरकारपासून मुक्त करण्यासाठी मी नवा पक्ष स्थापण्याचा निर्णय घ्यावा, अशी इच्छा माझे समर्थक आणि हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.
-अजित जोगी, माजी मुख्यमंत्री.