विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त पथक ब्रिटनला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:09 PM2018-12-09T16:09:06+5:302018-12-09T16:09:37+5:30
सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संयुक्त पथक रविवारी ब्रिटनला रवाना झाले आहे.
नवी दिल्ली : भारतातील बँकांना सुमारे ९ हजार कोटी रुपयांना फसवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत उद्या (दि.10) ब्रिटनमधील न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संयुक्त पथक रविवारी ब्रिटनला रवाना झाले आहे.
सीबीआयचे संयुक्त संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वात हे पथक ब्रिटनला रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. दरम्यान, ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणू नका, यासाठी विजय मल्ल्याने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला नोटीस बजावली आहे.
A joint team of CBI and ED led by CBI Joint Director A Sai Manohar has left for UK for court proceedings there on India’s request seeking extradition of Vijay Mallya. Court is expected to pronounce its judgment on Monday. Earlier Rakesh Asthana was leading this case. pic.twitter.com/3lh0EafiSN
— ANI (@ANI) December 9, 2018
अंमलबजावणी संचालनालयाने मागील महिन्यात मुंबईच्या विशेष मनी लॉन्ड्रिग कायदा न्यायालयात मल्ल्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. विजय मल्ल्याने बँकांच्या कर्जाची परतफेड न करता देशातून पळ काढला आहे. त्यामुळे त्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करावे, अशी विनंती ईडीने या न्यायालयाला केली होती. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. पण मल्ल्याच्या वकिलांनी या सुनावणीवर आक्षेप घेत ती थांबविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. विजय मल्ल्याला ब्रिटनमध्ये मागील वर्षी अटक झाली होती. तो सध्या जामिनावर आहे. तसेच त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीही याचिका सुरू आहे. अटक झाली याचाच अर्थ तो फरार नाही. यामुळे ‘फरार गुन्हेगार’ हा शब्द काढावा, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे.
मायकेलच्या प्रत्यार्पणाशी माझ्या ऑफरचा संबंध नाही, विजय मल्ल्याचा खुलासा
विजय मल्ल्याने आता मूळ रक्कम परत करण्याच्या आपल्या ऑफरचा अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मायकेल याच्या प्रत्यार्पणाशी अजिबात संबंध नाही, असा खुलासा केला आहे. ख्रिस्तियन मायकेल याला दुबईतून प्रत्यार्पण करून गेल्या मंगळवारी रात्री भारतात आणल्यानंतर लगेचच विजय मल्ल्याने आपण बँकांकडून घेतलेल्या कर्जाची मूळ रक्कम परत करायला तयार आहोत, असे म्हटले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे लंडनमधील न्यायालयात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मायकेलच्या प्रत्यार्पणाप्रमाणे आपलेही झाले, तर आपण अडचणीत येऊ , या भीतीनेच त्याने मुद्दलाची रक्कम देण्याची तयारी दर्शवली, अशी चर्चा सुरू झाली होती.