भारत, सिंगापूर नौदलाचा संयुक्त युद्धसराव सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 08:59 AM2022-10-29T08:59:49+5:302022-10-29T09:02:14+5:30
विशाखापट्टणम, बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणी होणारा हा युद्धसराव हिंद महासागरातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आयोजिला आहे, असे भारतीय नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
विशाखापट्टणम : भारत व सिंगापूरच्या नौदलांचा संयुक्त युद्धसराव २६ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून तो येत्या रविवारी ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. विशाखापट्टणम, बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणी होणारा हा युद्धसराव हिंद महासागरातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आयोजिला आहे, असे भारतीय नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांतल्या नौदलांच्या युद्धसरावाची ही २९वी फेरी आहे. या युद्धसरावाला सिंगापूर- इंडिया मेरिटाइम बायलॅट्रल एक्सरसाइज (सिम्बेक्स) असे नाव देण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी दोन टप्प्यात नौदल युद्धसराव करण्यात येत आहे. विशाखापट्टणमच्या किनारी भागात २६ व २७ ऑक्टोबर रोजी पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात शुक्रवारपासून आयोजिलेला दुसरा टप्पा ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
या युद्धसरावात सिंगापूरची आरएसएस स्टॉलवर्ड, आरएसएस व्हिजिलन्स या युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. या दोन्ही युद्धनौका विशाखापट्टणम येथे २५ ऑक्टोबर रोजी दाखल झाल्या. दोन्ही देशांतील सिम्बेक्स युद्धसराव सर्वप्रथम १९९४ मध्ये पार पडला होता. त्यावेळी त्याला लायन किंग असे नाव देण्यात आले होते. गेल्या वर्षी २ ते ४ सप्टेंबर या कालावधीतही सिम्बेक्स युद्धसराव पार पडला होता.