सरदारजींवरील ‘जोक्स’; ५ एप्रिलला सुनावणी
By Admin | Published: March 18, 2016 02:03 AM2016-03-18T02:03:05+5:302016-03-18T02:03:05+5:30
शीख समुदायांसंबंधी विनोद किंवा चुटकुल्यांच्या (जोक्स)प्रसारावर निर्बंध आणण्याबाबत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (शिगुप्रस) याचिकेसह अन्य याचिकांवर ५ एप्रिल
नवी दिल्ली : शीख समुदायांसंबंधी विनोद किंवा चुटकुल्यांच्या (जोक्स)प्रसारावर निर्बंध आणण्याबाबत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (शिगुप्रस) याचिकेसह अन्य याचिकांवर ५ एप्रिल रोजी सुनावणी करण्याला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली
आहे.
अशा चुटकुल्यांचा व्यापारदृष्ट्या वापर केला जात असेल तर कारवाई केली जाऊ शकते, असेही सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अॅड. सतिंदरसिंग गुलाटी यांनी ज्याबाबत उपन्यायिक आदेश दिला जाऊ शकतो, असे भाग निश्चित करावे असेही खंडपीठाने म्हटले.
अशा विनोदातून टर उडविली जात असल्याने संपूर्ण शीख समुदायामध्ये छळवणूक होत असल्याची भावना निर्माण असेल तर आम्ही निश्चितच काही मुद्यांकडे लक्ष देऊ शकतो.
विशिष्ट भाषा आणि धर्मामुळे शिखांबाबत भेदभाव केला जात असून एक रुढीवादी धारणा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन गुलाटी यांनी न्यायालयात केले. (वृत्तसंस्था)
‘त्या’ वेबसाईटवर निर्बंध घालण्याबाबतही होणार विचार..
- दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने(डीएसजीएमसी) दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अशा विनोदांमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावू शकतात, हे लक्षात घेत, समाजाने संवेदनशील होण्याची गरज आहे. विनोदाचा प्रसार व्यापारदृष्ट्या केला जात असेल तर ते रोखले जाऊ शकतात.
- सायबर जगतात जातीयवादी किंवा सांप्रदायिक चुटकुल्यांचा प्रसार रोखण्यासंबंधी समितीने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्यास त्याबाबत समीक्षा केली जाईल. अशा विनोदाचा आनंद घेणारे लोक कमी असले तरी त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर प्रभाव पडतो, असे महिला वकील हरविंदर चौधरी यांनी एका जनहित याचिकेत म्हटले होते.