पत्रकार कोठारी हत्याकांड; भंडार्यात एकास अटक
By Admin | Published: June 29, 2015 12:37 AM2015-06-29T00:37:54+5:302015-06-29T00:37:54+5:30
>मुख्य आरोपी फरारच : मध्य प्रदेश पोलिसांची कारवाईतुमसर (भंडारा) : मध्य प्रदेशातील कटंगी येथील पत्रकार संदीप कोठारी यांच्या हत्या प्रकरणी तुमसर येथे योगेश कन्हैय्यालाल आहुजा (३२) यास त्यांच्या निवासस्थानी २६ जुनच्या मध्यरात्री मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. हत्येचा मुख्य सूत्रधार राजेश नरकेसवानी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुमसर तालुक्यातील डोंगरी (बु.) चिखला येथे मँगेनिजच्या खाणी आहेत. मध्य प्रदेशातील कटंगी जवळील तिरोडी, भरवेली येथे मोठ्या प्रमाणात मँगेनिजचा साठा असल्यामुळे तुमसरातील व्यापारी त्याचा व्यवसाय करतात. त्यात योगेश आहुजा याचा समावेश होता. आहुजाचे कापड दुकानही आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या व्यवसायात अडसर ठरणारा तरुण पत्रकार संदीप कोठारी यांनी मँगेनिज व वाळूच्या अवैध तस्करीवर लेखन केले होते. त्यांच्या लिखानामुळे दुखावलेले मँगेनिज तस्करांनी एकत्र येऊन त्यांना संपविण्याचा कट रचला. त्यानुसार १९ जुनला कोठारी हे मित्रांसोबत दुचाकीने घरी जात असताना वाटेत अडवून त्यांच्या मित्रांना मारहाण करून कोठारींचे अपहरण करण्यात आले. कोठारी घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी कटंगी पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदविली होती. २१ जून रोजी खून केल्यानंतर विशाल तांडी, ब्रजेश डहरवाल यांनी कटंगी पोलिसात आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली दिली. तर वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांना त्याचदरम्यान जळालेला मृतदेह आढळून आला. तो कोठारी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)