पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरण, चौघांना आजीवन, तर एकाला तीन वर्षांची कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 05:58 AM2023-11-26T05:58:25+5:302023-11-26T05:58:45+5:30
Navi Delhi: सन २००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने चार आरोपींना आजीवन कारावास, तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
नवी दिल्ली - सन २००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने चार आरोपींना आजीवन कारावास, तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांनी हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात येत नसल्याने मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी फेटाळून लावली.
न्यायालयाने आजीवन कारावास ठोठावलेल्या आरोपींमध्ये रवि कुमार, अमित शुक्ला, बलजित मलिक आणि अजय कुमार यांचा समावेश आहे. तसेच त्यांना प्रत्येकी १.२५ लाखांचा दंड ठोठावला. तसेच सेठीला ७.२५ लाखांचा दंड ठोठावला.
मागील महिन्यात ठरविले दोषी
- कार्यालयातून घरी परतणाऱ्या सौम्या यांची ३० सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत गोळ्या झाडून हत्या केली होती. लूटमार करण्यासाठी ही हत्या केली होती.
- सुमारे १५ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर १८ ऑक्टोबरला न्यायालयाने चौघांना हत्या आणि मकोकाअंतर्गत दोषी ठरविले होते.
-अन्य पाचव्या आरोपीला चोरीचा मुद्देमाल जवळ बाळगणे, गुन्ह्यासाठी मदत करणे, तसेच मुख्य आरोपींनी विविध कारवायांसाठी मदत केल्याबद्दल न्यायालयाने दोषी ठरविले होते.