सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र

By admin | Published: September 18, 2016 03:53 AM2016-09-18T03:53:22+5:302016-09-18T03:53:22+5:30

राजकीय नेता असो की पत्रकार, देशाची जबाबदारी सर्वांवर सारखीच आहे.

The journalist is the true friend of the political leaders who show the way to the truth | सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र

सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र

Next

सुरेश भटेवरा,

जयपूर- राजकीय नेता असो की पत्रकार, देशाची जबाबदारी सर्वांवर सारखीच आहे. सर्व क्षेत्रांत सौहार्दाचे व समन्वयाचे वातावरण कायम राहावे यासाठी काय बोलावे आणि काय बोलू नये हे पथ्य जसे नेत्याने पाळायचे असते, तसेच काय छापावे वा दाखवावे आणि काय छापू वा दाखवू नये, याचे तारतम्य पत्रकारांनीही बाळगायला हवे. पत्रकार हा राजकीय नेत्याचा मित्र आहे, कारण परिणामांची पर्वा न करता तोच सत्याचा मार्ग दाखवीत असतो. असे मित्र सभोवती असले तरच देशाची प्रगती आणि विकास वेगाने होणे शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी शनिवारी येथे केले.
स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कार आणि अशोक गहलोत पत्रकार मित्रता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते.
राठोड यांना उद्देशून लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा स्वागतपर भाषणात भाजपा काही काळापूर्वी मीडिया फ्रेंडली पक्ष होता. केंद्रात सत्तेवर आल्यापासून मात्र पक्षाचे नेते, मंत्री आणि प्रवक्ते पत्रकारांशी अंतर ठेवून वागतात, याचे कारण काय? पूर्वी नसलेली ही अजब शांतता का पाहायला मिळते, असे सवाल केले होते. त्याचे उत्तर देताना राठोड म्हणाले, पूर्वी कधी नव्हते इतके सहकार्य व समन्वयाचे वातावरण मोदी सरकारमधे आहे. आवश्यक ती सारी माहिती आम्ही जनतेसमोर सादर करतो. पूर्वीच्या केंद्र सरकारातील मंत्री आपापसात चर्चा व सहकार्य करण्याऐवजी पत्रकारांच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधायचे. आता तसे होत नाही. यूपीए सरकारच्या काळापेक्षा कितीतरी अधिक पत्रकार परिषदा मोदी सरकारच्या मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत घेतल्या. पत्रकारांचा कोणताही प्रश्न कधी टाळला नाही. दिल्लीतच नव्हे, तर देशाच्या विविध भागांत पत्रकारांशी संवाद साधण्याचे उपक्रम माहिती व प्रसारण मंत्रालयाने सुरू केले आहेत. प्रादेशिक वृत्तपत्रांना अग्रक्रम देण्यासाठी हा नवा प्रयत्न आहे. विचारस्वातंत्र्य कधीही एकांगी नसते. त्याच्या बाजूचे आणि विरोधातले संदर्भही प्रसारमाध्यमांनी तपासून पाहिले पाहिजेत.
जयपूरच्या इंद्रलोक सभागृहात भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात विख्यात पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, नवभारत टाइम्सचे माजी संपादक विश्वनाथ सचदेव, इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे उपाध्यक्ष सोमेश शर्मा, जयपूरच्या हार्ट केअर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मंजू शर्मा आदींच्या विशेष उपस्थितीत ५ विजेत्या पत्रकारांना स्व. जवाहरलालजी दर्डा स्मृती पुरस्काराने तसेच अन्य ५ पत्रकारांना अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्काराने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विश्वनाथ सचदेव यांना लोकमततर्फे जीवन गौरव पुरस्कार अर्पण करण्यात आला.
राजस्थानात पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना १९९९ सालापासून या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यंदाचा सन २0१५-१६चा पुरस्कार द डेझर्ट रेलच्या संपादिका श्रीमती अमृता मौर्य यांना तर अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्कार नॅशनल अ‍ॅफेअर्स न्यूज नेटवर्कचे संपादक विजय त्रिवेदी यांना देण्यात आला. अन्य विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्कार : विनोद भारद्वाज, चंद्र मेहता, सुरेंद्र जैन पारस व श्रीमती राखी जैन, अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्कार : चिरंजीव जोशी सरोज, पद्म मेहेता, प्रकाश भंडारी व महेशचंद्र शर्मा.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले, स्वातंत्र्यानंतर समाजसेवेचे व्रत म्हणून जवाहरलाल दर्डांनी पत्रकारितेचे क्षेत्र निवडले. या माध्यमाची समाजाला गरज आहे, याची त्यांना जाणीव होती. आता राजकारणासह विविध क्षेत्रांत स्वार्थी प्रवृत्तींची अनागोंदी माजली असताना पत्रकारांची लेखणीही विकली जात असेल तर देशाचे काय होणार, असा प्रश्न मनात उभा राहतो. दोन्ही क्षेत्रांत सारेच अप्रामाणिक नाहीत, हे सत्यही लोकांसमोर आणले पाहिजे.
वेदप्रताप वैदिक व विश्वनाथ सचदेव या दोन मान्यवर पत्रकारांची लक्षवेधी जुगलबंदी पत्रकारिता नेमकी कशी असावी, पत्रकारांनी कोणती पथ्ये पाळावीत, या विषयाबाबत झाली. पत्रकारांनी सत्तेच्या तसेच विरोधकांच्या राजकारणापासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे. नि:पक्षपातीपणे न्यायाधीशाची भूमिका बजावली पाहिजे, असे वैदिक म्हणाले, तर विश्वनाथ सचदेव म्हणाले, व्यवस्था कोणतीही असो, सरकार कोणाचेही असो, पत्रकाराची भूमिका सातत्याने विरोधकाची आहे, याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे व प्रामाणिकपणाने त्याने ती बजावली पाहिजे. त्यासाठी राजकारणापासून त्याने स्वत:ला दूर ठेवण्याची गरज नाही. सभागृहात गोंधळ घालून गदारोळ माजवणाऱ्या विरोधकासारखी भूमिका मात्र मला अभिप्रेत नाही, तर सत्यासाठी सदैव जागरूक असलेल्या पत्रकारितेची गरज देशाला आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक लोकमत मीडियाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी केले. सूत्रसंचालन लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा व पत्रकार अनुभा अग्रवाल यांनी केले. धीरेंद्र जैन यांनी पुरस्कारांची माहिती दिली, तर आभार प्रदर्शन जयपूरच्या पिंक सिटी पे्रस क्लबचे अध्यक्ष वीरेंद्रसिंग राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनाची सूत्रे जयपूरचे पत्रकार सुरेश कौशिक यांनी हाताळली.

Web Title: The journalist is the true friend of the political leaders who show the way to the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.