सरकारी कार्यालयात आता पत्रकारांना नो एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 08:52 PM2018-01-05T20:52:34+5:302018-01-05T20:53:52+5:30
उत्तराखंड सरकारनं सरकारी कार्यालयांत पत्रकारांना प्रवेशाच मज्जाव केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार पत्रकारांना आता सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करता येणार नाही. महत्त्वाच्या प्रसंगी पत्रकारांना काही माहिती हवी असल्यास ते थेट सरकारी कार्यालयांत जात असत.
डेहराडून- उत्तराखंड सरकारनं सरकारी कार्यालयांत पत्रकारांना प्रवेशाच मज्जाव केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार पत्रकारांना आता सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करता येणार नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महत्त्वाच्या प्रसंगी पत्रकारांना काही माहिती हवी असल्यास ते थेट सरकारी कार्यालयांत जात असत. परंतु उत्तराखंड सरकारच्या निर्णयामुळे त्यांना आता रिसेप्शन काऊंटरवर येऊन माहिती मागावी लागणार आहे, असं उत्तराखंड सरकारच्या आदेशात म्हटलं आहे.
सरकारी माहिती सार्वजनिक होऊ नये यासाठी उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी 27 डिसेंबरला हा आदेश जारी केला असून, तो आता राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये पत्रकारांना थेट सरकारी कार्यालयांत प्रवेश करणं शक्य होणार नाही. उत्तराखंड सरकारचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी घेतलेल्या वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा त्यामागील उद्देश असल्याचं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे. रोज संध्याकाळी 4 वाजता सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाणार असल्याचं उत्पल कुमार म्हणाले आहेत. ब-याचदा मंत्रिमंडळातल्या बैठकीतील गुप्त निर्णय हे पत्रकारांमुळे सार्वजनिक होत होते. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारनं हा निर्णय घेतला आहे.