फेसबूक लाईक्सने मिळणारा आनंद काही क्षणांचा
By admin | Published: May 4, 2017 12:57 PM2017-05-04T12:57:27+5:302017-05-04T12:58:35+5:30
फेसबूक लाईक्समुळे मिळणारा शॉर्ट टर्म आनंद आपल्यासोबत अनेक साईड इफेक्ट्स घेऊन येतो जे आपल्यासाठी खूप धोकादायक असतात
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 4 - कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट असो ती फेसबूकवर अपडेट होत असते. त्यातल्या त्यात आपण ट्रेंडमध्ये किंवा चर्चेत असलेल्या एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर लिहिलं तर खूप लाईक्स मिळतात असं काहीजणांना वाटतं. त्यामुळे सतत अशा पोस्ट्स अपडेट होत असतात. सोशल साईट्सवर पोस्ट जितकी लोकप्रिय होईल, तितका जास्त आनंद युझर्सना होत असतो. मात्र या शॉर्ट टर्म म्हणजेच थोड्या वेळासाठी मिळणा-या आनंदाचं व्यसन धोकादायक असू शकतं. एका सर्व्हेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे.
सर्व्हेक्षणातून काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. यानुसार हा शॉर्ट टर्म आनंद आपल्यासोबत अनेक साईड इफेक्ट्स घेऊन येतो जे आपल्यासाठी खूप धोकादायक असतात. यामुळे फेसबूकवर मिळालेल्या लाईक्समुळे ना लोकांचा मूड सुधारतो, ना त्यांना चांगलं वाटतं. ब्रिटनमधील ब्रिटीश सायकॉलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक संमेलनात हे सर्व्हेक्षण मांडण्यात आलं. फेसबूक आणि ट्विटर वापरणा-या 340 लोकांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे हे सर्व्हेक्षण करण्यात आलं.
सर्व्हेक्षणादरम्यान सोशल मीडियाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. उदाहरणार्थ "सोशल मीडियावर लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचल्यास कसं वाटतं ?" किंवा "एखाद्याला किती लाईक्स मिळतात यावरुन मी त्याची लोकप्रियता ठरवतो का ?".
"सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर आपल्या आरोग्यावर होत असून, यामुळे छोट्या, सामान्य चिंता वाढू लागल्या आहेत. सर्व्हेक्षण फार छोट्या प्रमाणात केलं गेलं असलं तरी यातून परिणाम स्पष्ट दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कशाप्रकारे संवाद साधला जातो याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो, जो नेहमीच सकारात्मक नसतो", असं ब्रिटन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्सचे मार्टिन ग्राफ यांनी सांगितलं आहे.
सर्व्हेक्षणादरम्यान लक्षात आलं की, भाग घेतलेल्यांपैकी काहींना लाईक्स मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत असल्याचं मान्य केलं. अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्याची शक्यता जाणवली.
यामध्ये काहीजण असेही होते ज्यांनी फोटोला किती लाईक्स मिळाले यावरुन तो फोटो डिलीट करायचा की प्रोफाईल म्हणून ठेवायचा हे ठरवलं. मिळणारे लाईक्स दरवेळी एखाद्याला आपल्याबद्दल संतृष्ट करत नसल्याचं समोर आलं आहे. तसंच निराशेच्या वेळी त्यामुळे आनंद मिळतो असंही नाही.