जेपी नड्डांच्या पत्नीची चोरीला गेलेल्या कारची तीनवेळा विक्री, वाचा संपूर्ण घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:09 PM2024-04-08T12:09:59+5:302024-04-08T12:21:14+5:30
याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींसाठी चौकशी सुरू आहे.
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चोरीला गेलेली फॉर्च्युनर कार रविवारी वाराणसीतील बेनियाबाग पार्किंगमधून पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार दिल्लीतील गोविंदपुरी भागातून १९ मार्च रोजी चोरीला गेली होती. यानंतर चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींसाठी चौकशी सुरू आहे.
दक्षिण-पूर्व पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार गोविंदपुरी येथून चोरीला गेली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कार शोधण्याची जबाबदारी एसीपी आणि एएटीएसवर सोपवली होती. याप्रकरणी पोलिसांनी लखनऊ येथील आवास विकास कॉलनीतील रहिवासी शिवांश त्रिपाठी आणि अन्य दोन रिसीव्हर्सना अटक केली. लखीमपूर खेरी येथील सलीम आणि सीतापूर येथील रहिवासी मोहम्मद रईस अशी रिसीव्हर्सची नावे आहेत.
गुन्ह्यात वापरलेली दुसरी कारही पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय, अन्य आरोपींना अटक करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने कार चोरल्याचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी सांगितले. तसेच, फरीदाबादमधी रहिवाशी शाहिद आणि दिल्लीच्या चंदन होला येथील रहिवाशी फारूख यांनी ही कार चोरली होती. शाहिदने ही कार सलीमला विकली, असे एएटीएसच्या चौकशीत समोर आले.
शिवांश त्रिपाठीने दिलेल्या माहितीवरून लखीमपूर खेरी येथे छापा टाकून आरोपी सलीमला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, सलीमने ही कार मोहम्मद रईसला विकली होती. रईसला अटक करून चौकशी केली असता त्याने अमरोहा येथील रहिवासी फुरकान याला कार विकल्याचे सांगितले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कार वाराणसी येथील पार्किंगमधून जप्त करण्यात आली.
पोलिसांना चकमा देण्यासाठी कारमध्ये पत्नी आणि मुलांना बसवले
दिल्ली सीमा ओलांडताना पोलिसांना चकमा देण्यासाठी शाहिद फरीदाबादला गेला होता. तेथे त्याने पत्नी आणि मुलांना कारमध्ये बसवले. ब़डखल येथे कारची नंबर प्लेटही बदलण्यात आली. यानंतर ही कार उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधून वाराणसीला पोहोचली. नंतर ही कार नागालँडला नेण्याचा प्लॅन होता, असे शाहिदने पोलीस चौकशीत सांगितले.