भाजपचे सारे नेते आज राजस्थानात येणार; नड्डांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये शाही लग्नसोहळा; मोदी, शहा येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:30 PM2023-01-25T16:30:26+5:302023-01-25T16:30:50+5:30
लग्नादरम्यान होणारी व्हीव्हीआयपी मुव्हमेंट पाहता जयपूर आयुक्तालय पोलिस आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या धाकट्या मुलाचे आज सायंकाळी जयपूरमध्ये रॉयल अंदाजात लग्न होणार आहे. जयपूरच्या हॉटेल इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यायसायिक रमाकांत शर्मा यांची मुलगी रिद्धी ही नड्डांची सून बनणार आहे. सायंकाळी पावणे सात वाजता वरातीच्या स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार?
हरीश नड्डाच्या लग्नाला राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती असणार आहे. याचबरोबर उद्योगपती आणि सेलिब्रिटी देखील असतील. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, प्रभारी अरुण सिंह, खासदार दिया कुमारी, प्रदेश संघटन सरचिटणीस चंद्र शेखर, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, कैलाश चौधरी, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, विरोधी पक्ष उपनेते राजेंद्र राठोड यांच्यासह अनेक खासदार-आमदार येणार आहेत. परंतू या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांचे नाव कुठेही दिसत नाहीय.
लग्नादरम्यान होणारी व्हीव्हीआयपी मुव्हमेंट पाहता जयपूर आयुक्तालय पोलिस आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 28 जानेवारीला हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील विजयपूर गावात रिसेप्शन असणार आहे. यानंतर दिल्लीतही थाटामाटात रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. यावेळी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
जेपी नड्डा यांचा मोठा मुलगा गिरीश नड्डा याचा विवाह हनुमानगढ येथील व्यापारी अजय ज्यानी यांच्या मुलीशी झाला होता. ती देखील राजस्थानचीच आहे. धाकट्या मुलाची होणारी पत्नीदेखील राजस्थानचीच आहे.