टीकेच्या भीतीने न्यायाधीश आरोपीला जामीन देत नाहीत, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:17 AM2022-11-21T10:17:48+5:302022-11-21T10:18:40+5:30
बार कौन्सिलने सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, जिल्हा न्यायालयांतील न्यायाधीशांवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.
नवी दिल्ली : जिल्हा न्यायालयांसह कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीश सहसा आरोपीला जामीन देण्यास इच्छुक नसतात. एखाद्या खटल्यात जामीन देण्याचा निर्णय घेतला तर आपल्यावर टीका केली जाईल, अशी भीती या न्यायाधीशांच्या मनात असते, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
बार कौन्सिलने सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, जिल्हा न्यायालयांतील न्यायाधीशांवर संपूर्ण विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. सामान्य माणसांच्या हितासाठीदेखील ते आवश्यक आहे. न्याययंत्रणेत जिल्हा न्यायाधीशांना योग्य आदर मिळत नसेल, तर हे न्यायाधीश एखाद्या प्रकरणात आरोपीला जामीन देतील अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो, असा सवालही चंद्रचूड यांनी विचारला.
काॅलेजियम योग्यच
कॉलेजियम न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत योग्य प्रकारे निर्णय घेत आहे. राष्ट्रीय स्तरावरील विचार करून कॉलेजियम आपले निर्णय घेत असते, असे चंद्रचूड यांनी सांगितले.