कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 07:15 AM2024-10-18T07:15:26+5:302024-10-18T07:16:52+5:30

अनेक महत्त्वपूर्ण निकालांमध्ये दिले योगदान; कायद्यातील प्रावीण्याचा होणार देशाला फायदा

Judges upholding Article 370 annulment decision. Sanjeev Khanna to be Chief Justice; 51st Chief Justice will hold office for 6 months | कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव

कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होणार असून, त्यांनी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची शिफारस केली, खन्ना यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारला तर ते ६ महिने सरन्यायाधीश म्हणून पदावर राहतील. ते देशाचे ५१वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.

शिक्षण कुठे घेतले? 
त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर येथे कायद्याचे शिक्षण घेतले. खन्ना यांनी लवाद, व्यावसायिक कायदा, कंपनी कायदा आणि फौजदारी कायदा यांसह विविध क्षेत्रांत काम केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनविण्यावरून वाद
३२ न्यायाधीशांना डावलून न्यायमूर्ती खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनविण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. १० जानेवारी २०१९ रोजी कॉलेजियमने त्यांच्या जागी न्यायमूर्ती महेश्वरी आणि  ज्येष्ठतेनुसार ३३व्या स्थानावर न्यायमूर्ती खन्ना यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची पार्श्वभूमी
- १४ मे १९६० रोजी जन्म
- १९८३  मध्ये त्यांनी दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली.
- सुरुवातीला दिल्लीतील तीस हजारी येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस. नंतर दिल्ली न्यायालयात १४ वर्षे काम. 
- २००४ मध्ये दिल्लीसाठी स्थायी वकील म्हणून नियुक्ती
- दिल्ली उच्च न्यायालयाला महत्त्वाच्या खटल्यांमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी अनेकदा ॲमिकस क्युरी म्हणून काम
- २००५ : दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी नेमणूक.
- २००६ मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीशपदावर नियुक्ती.
- १८ जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती
- १७ जून २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात कायदा सेवा समितीचे अध्यक्ष
- न्या. संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एच. आर. खन्ना यांचे पुतणे आहेत. १९७३ साली केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. त्या खंडपीठात न्या. एच. आर. खन्ना यांचा समावेश होता.

कोणते निकाल दिले? 
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर टाकलेल्या मतांची १०० टक्के व्हीव्हीपीएटी पडताळणी करण्याची मागणी करणारी एडीआरची याचिका त्यांनी फेटाळली होती.
निवडणूक रोखे पद्धत ही घटनाबाह्य असल्याचा निकाल पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या घटनापीठाने दिला होता. त्यात न्या. संजीव खन्ना यांचा समावेश होता. 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णयही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कायम ठेवला होता. त्यातही न्या. संजीव खन्ना यांचा समावेश होता.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.

खन्ना यांच्यानंतर आणखी काेण? 
न्यायमूर्ती खन्ना यांच्यानंतर पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा आहे. ते मे २०२५ मध्ये पदभार स्वीकारू शकतात. भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश झाल्यास ते दुसरे मागासवर्गीय सरन्यायाधीश ठरतील. तेही सरन्यायाधीश म्हणून सहा महिने पदावर राहतील. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे.

Web Title: Judges upholding Article 370 annulment decision. Sanjeev Khanna to be Chief Justice; 51st Chief Justice will hold office for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.